Home » पांचगणी » भोसे मारहाणीत मृत्यू प्रकरण: पाचगणी पोलिसांची धडक कारवाई, २४ तासांत चारही आरोपींना बेड्या; १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी!

भोसे मारहाणीत मृत्यू प्रकरण: पाचगणी पोलिसांची धडक कारवाई, २४ तासांत चारही आरोपींना बेड्या; १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी!

पाचगणी (प्रतिनिधी):

पांचगणी : दारूच्या नशेत घरात डोकावून पाहिल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून करणाऱ्या चारही संशयित आरोपींना पाचगणी पोलिसांनी अवघ्या ७ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. भोसे खिंड येथील ‘अतिथी’ हॉटेल परिसरात ही खळबळजनक घटना घडली होती. न्यायालयाने सर्व आरोपींना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​अक्षय रमेश जाधव (वय २७, रा. भिगवण, इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (वय ३७, रा. भोसे खिंड), अविनाश सतिश भोसले (वय ३१, रा. बावधन, वाई), राहुल जनार्दन राजपुरे (वय ३७, रा. कणूूर, वाई) आणि अमोल गेणदेव वाडकर (वय ३६, रा. चिखली, वाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसह ८ जुलै रोजी भोसे येथील हॉटेल अतिथीमध्ये मुक्कामासाठी आला होता. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या अक्षयला मित्रांनी खोलीत ठेवून बाहेरून कडी लावली होती. मात्र, काही वेळाने तो खोलीबाहेर पडला. हॉटेलच्या जवळच राहणारे संशयित आरोपी सूर्यकांत गोळे यांच्या घरात अक्षयने डोकावून पाहिल्याचा राग मनात धरून, चारही आरोपींनी त्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान अक्षयचा पुण्यात मृत्यू झाला.

​घटनेनंतर बारामतीतून पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग होताच, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, आणि डीएसपी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  दिलीप पवार व पीएसआय बालाजी सोनुने यांनी तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ७ तासांच्या आत चारही आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.

​आज (१० जुलै) आरोपींना महाबळेश्वर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी एपीआय दिलीप पवार, उपनिरीक्षक बालाजी सोनुने, हवालदार श्रीकांत कांबळे, संदीप मांढरे आणि प्रवीण कांबळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers