पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ : “आमचा विरोध विकासाला किंवा कामाला मुळीच नाही, तर काम करण्याच्या मनमानी पद्धतीला आणि होणाऱ्या दिरंगाईला आहे…” असा संतप्त सूर लावत कुडाळ येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राथमिक जिल्हा मार्गाच्या रखडलेल्या व दर्जाहीन कामाविरोधात आवाज उठवत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कुडाळमधील इंदिरानगर ते बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौक या प्राथमिक जिल्हा मार्गासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. अर्धवट डांबरीकरण, खोदून ठेवलेले रस्ते आणि काही ठिकाणी होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या सर्व प्रकारावर कुडाळमधील जागृत नागरिकांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयात अनौपचारिक बैठक घेतली. या बैठकीनंतर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने विशेष ग्रामसभा बोलावण्याचा आग्रह ग्रामसेवकांकडे धरला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर तातडीने अंकुश लावण्याची मागणी केली.
बांधकाम विभागाला ‘अल्टिमेटम’
ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागाला अधिकृत पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार, १४ ऑगस्ट २०२६ पूर्वी संबंधित अधिकारी व ठेकेदाराने प्रत्यक्ष कुडाळमध्ये येऊन पाहणी करावी. तसेच रस्त्याची रुंदी, गटारांची जागा आणि कामाचे नियोजन याबाबत ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून खुलासा करावा, अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे.
१५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा
जर १४ ऑगस्टपर्यंत प्रशासनाकडून योग्य तो खुलासा झाला नाही किंवा ठोस आश्वासन मिळाले नाही, तर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी कुडाळमधील सर्व जागृत नागरिक, युवा वर्ग व ग्रामस्थ कुडाळ ग्रामपंचायतीसमोर सामूहिक उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार ‘समस्त कुडाळ ग्रामस्थां’च्या वतीने करण्यात आला आहे.



