Home » तापोळा » महाबळेश्वरच्या दुर्गम भागात बिबट्याचा उच्छाद; ‘विषारी नागापेक्षा बिबट्याचीच दहशत भयानक!’, सूर्यास्तापूर्वीच घरे बंदिस्त करण्याची वेळ

महाबळेश्वरच्या दुर्गम भागात बिबट्याचा उच्छाद; ‘विषारी नागापेक्षा बिबट्याचीच दहशत भयानक!’, सूर्यास्तापूर्वीच घरे बंदिस्त करण्याची वेळ

झांजवडसह १५ हून अधिक गावांमध्ये भीतीचे सावट; वन विभागाने तातडीने पिंजरे लावून गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची उद्विग्न मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

​बामणोली : महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात सध्या माणसांपेक्षा बिबट्याच्या भयावह दहशतीने स्थानिक भूमिपुत्रांना रात्रीच्या अंधारापूर्वीच घरात बंदिस्त व्हावे लागत आहे. “जमिनीवर सरपटणाऱ्या विषारी नागाची भीती एक वेळ परवडली, पण या बिबट्याच्या भीतीने आमचे जगणेच मुश्कील केले आहे,” अशी अत्यंत उद्विग्न भावना झांजवड येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव यांच्यासह परिसरातील भूमिपुत्रांनी व्यक्त केली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा वन विभागाने माणुसकीच्या नात्याने तरी या गंभीर परिस्थितीकडे तातडीने पहावे, अशी संतप्त मागणी आता जोर धरू लागली आहे.

​मानवी वस्तीच्या थेट उंबरठ्यापर्यंत बिबट्याचे आगमन झाल्यामुळे सध्या शेतात भात लावणीच्या कामात व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतात काम करताना लागवडीकडे लक्ष द्यायचे की बिबट्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करायचा, अशा दुहेरी विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. या दहशतीचा सर्वात मोठा फटका शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना बसत आहे. रस्त्याने ये-जा करताना साधे कुत्रे जरी आडवे आले तरी बिबट्याच आला की काय, या भीतीने चिमुकल्यांच्या छातीची धडधड वाढताना दिसत आहे.

​गेल्या काही दिवसांपासून जावळी व महाबळेश्वर तालुक्यांच्या सीमावर्ती दुर्गम परिसरात बिबट्याने शिकारीसाठी पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले आहे. परिसरातील अनेक कोंबड्या, बकऱ्या, कुत्री व पाळीव जनावरांवर हल्ला करून काहींचा जीव घेतला आहे, तर काहींना गंभीर जखमी केले आहे. परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसून बिबट्या दबा धरत असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास कमालीचे घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडणे पूर्णपणे बंद झाले असून, अगदी आवश्यक काम किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला जाताना हातात कोयता, कुऱ्हाड अथवा सोबतीला कोणालातरी घेऊनच बाहेर पडावे लागत आहे.

​एखादी मोठी जीवितहानी होण्यापूर्वीच संबंधित वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कडक आणि ठोस उपाययोजना लागू कराव्यात, असे स्पष्ट मत जागरूक नागरिक अनंत जाधव व स्थानिकांनी व्यक्त केले आहे. शासनाने केवळ पोकळ आश्वासने न देता बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावून त्यांना जेरबंद करावे, रात्रीची विशेष गस्त सुरू करावी, अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने बिबट्याचे अचूक लोकेशन शोधावे आणि वस्ती व शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सौरऊर्जेवरील पथदिव्यांची सोय करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या किंवा जखमी झालेल्या पाळीव प्राण्यांची आर्थिक भरपाई प्रशासनाने विनाविलंब त्वरित द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

​झांजवड, गोरोशी, कुंभरोशी, देवळी, दुधगाव, चतुरबेट, घोणसपूर, हातलोट, दाभेमोहन, दाभेदाबेकर, बिरमणी, बिरवाडी, शिरणार, आकल्पे आणि तळदेव या संपूर्ण परिसरामध्ये वन विभागाने तातडीने विशेष गस्तीपथक सुरू करून दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करावे. या मोहिमेत वन विभागाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास स्थानिक ग्रामस्थ नेहमीप्रमाणे पुढाकार घेतील, असेही स्थानिकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers