Home » सातारा » गोडोली अतिक्रमण हटाव आणि सातारा बस स्थानक परिसरात तसेच ठेवा मोहीम…..

गोडोली अतिक्रमण हटाव आणि सातारा बस स्थानक परिसरात तसेच ठेवा मोहीम…..

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे. पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले. आता गोडोली अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र सातारा बस स्थानक परिसरातील अतिक्रमण तसेच ठेवा अशी अघोषित मोहीम कायम आहे. याबाबत सातारा नगर परिषदेला सातत्याने आठवण करून द्यावी वाटत आहे.

सातारा नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागामार्फत सातारा शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या गोडोली परिसरात सोमवारपासून दिनांक १० ऑगस्ट २०२६ पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच गोडोली जकात नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सातारा नगर पालिकेची तयारी झाली आहे.

तसेच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंटच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने गोडोली चौक परिसरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.या परिसरात शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये असल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सातारा बस स्थानक परिसर व सोमवार पेठेत असाच त्रास लोकांना सहन करावा लागतो. याबाबत सातत्याने प्रसार माध्यमातून आवाज उठवला जात आहे. सातारकर नागरिक करदाते आहेत. परंतु, अधिकृत टपरी दुकान ऐवजी अनाधिकृत टपऱ्यांचे संरक्षणदाते नगरपालिकेचे जावई आहेत. त्यांना काही लोकप्रतिनिधीचा पाठिंबा असल्यामुळेच अधिकारी सुद्धा अतिक्रमण काढण्यास धजवत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

हे अतिक्रमण काढण्याचा कधीच निर्णय झालेला नाही मात्र गोडोली परिसरातीलअतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेवक फिरोज पठाण, विनोद मोरे, रवी पवार, नगरसेविका अनिता फरांदे, पूनम निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरभट, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, शहर विकासचे नगरचनाकार तुषार मदने, क्षितिज शिंदे,सातारा नगरपालिका बांधकाम विभागाचे विनोद दहिफळे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह अधिकारी, वाहतूक पोलीस व नगरसेवकांनी परिसराची पाहणी केली. अशी मोहीम सातारा बस स्थानक व सोमवार पेठेत कधीच होणार नाही? त्या ठिकाणच्या टपऱ्याधारकांनी चिंता करू नये. आपलेच सरकार आहे. आपलेच नेते आहेत. आपलेच अधिकारी व नगरसेवक आहेत. मग भिती कुणाची ?अशी माहिती गोडोली परिसरातील नागरिकांनी दिली.

अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान फक्त गोडोली परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. अशी माहिती सातारा नगरपालिकेने दिलेले आहे. बाकी सातारा बस स्थानक सोमवार पेटीतील अतिक्रमणाबाबत त्यांनी नेहमी प्रमाणे मौन धारण केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers