Home » पांचगणी » पाचगणी शहरात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा

पाचगणी शहरात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी  : पाचगणी शहरात देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मुख्य चौकात ध्वजारोहण होताच उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला. शहरात सर्वत्र उत्साह, आनंद आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिक, विद्यार्थी, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती लावली.

 

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.४५ वाजता नगरपरिषद शाळा क्रमांक १ येथे झाली. शिक्षण सभापती सौ. विमल भिलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७.५५ वाजता नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. माधुरी अजित कासुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महात्मा गांधी तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

 

सकाळी ८.०५ वाजता पालिकेच्या मुख्य सार्वजनिक उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सकाळी ८.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पाचगणी नगरपरिषदेचे सर्व विद्यमान नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक-नगरसेविका, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, पाचगणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. एपीआय दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा केला.

पांचगणी शहरातील सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापक , मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. एकूणच, पाचगणी शहरात विविध ठिकाणी झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमुळे दिवसभर देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers