Home » पांचगणी » रानभाज्यांची माहिती उपक्रमांपुरती वा शासकीय सोहळ्यांपुरती मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हावी : तहसीलदार सचिन मस्के : पांचगणीत रान भाजी महोत्सव उदघाटन

रानभाज्यांची माहिती उपक्रमांपुरती वा शासकीय सोहळ्यांपुरती मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व्हावी : तहसीलदार सचिन मस्के : पांचगणीत रान भाजी महोत्सव उदघाटन

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या हे केवळ निसर्गाचे वैभव नसून, पोषणमूल्ये आणि औषधी गुणधर्मांची मोठी खाण आहे. बदलत्या जीवनशैलीत आणि आधुनिक आहाराच्या गर्दीत या पारंपरिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीपासून दूर जात आहे. हे रोखण्यासाठी आणि रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाबळेश्वर तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी शॉपिंग सेंटर येथे ‘रानभाजी महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. रानभाज्यांची ओळख केवळ अशा उपक्रमांपुरती वा शासकीय सोहळ्यांपुरती मर्यादित न ठेवता ती खऱ्या अर्थाने लोकाभिमुख झाली पाहिजे, असे स्पष्ट मत महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

 

​महोत्सवाचे उद्घाटन पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, तहसीलदार सचिन मस्के यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी माया लेंडे, मंडल कृषी अधिकारी शीतल नांगरे, उपकृषी अधिकारी आर. डी. शिंदे, तापोळा मंडल कृषी अधिकारी विजय गायकवाड, उपकृषी अधिकारी आर. डी. शिंदे, कृषी सेवक के. जे. गायकवाड, दिलीप आंब्राळे, चंद्रकांत पवार यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, ग्रामस्थ, कृषी पर्यवेक्षक व सहाय्यक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान रानभाज्यांची माहिती देणाऱ्या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करून उपस्थितांना तिचे वाटप करण्यात आले.

 

​या महोत्सवात भारंगी, भालगा, कुर्डी, मोहरी, चीचुर्टी, चिवचिव, कोहिळ, कर्टोलो, आळू, तोंडली, वॉटर ग्रास आणि शेंडवल यांसारख्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. पाचगणी-महाबळेश्वरच्या आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत प्रथमच या रानभाज्या प्रत्यक्ष पाहिल्या. त्यांची औषधी माहिती जाणून घेत पर्यटकांनी आवडीने खरेदीही केली, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि चांगला मोबदला मिळाला.

 

​मात्र, असे रानभाजी महोत्सव केवळ वार्षिक औपचारिकता किंवा एक दिवसाचा शासकीय कार्यक्रम ठरता कामा नयेत. कृषी विभागाने या महोत्सवांचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी दुर्गम व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना, विशेषतः महिला बचत गटांना यामध्ये सक्रिय सहभागी करून घेणे गरजेचे आहे. रानभाज्यांच्या पाककला स्पर्धा, सर्वाधिक रानभाज्यांचे संकलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान किंवा मूल्यावर्धनासाठी स्पर्धात्मक उपक्रम राबवल्यास शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. अशा स्पर्धेत्मक उपक्रमांमुळे रानभाज्यांचे केवळ संकलनच होणार नाही, तर त्यांच्या विक्रीला, प्रक्रियेला आणि ब्रँडिंगला मोठी चालना मिळेल.

​पाचगणी आणि महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने या भागातील रानभाज्या आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती पर्यटनाशी जोडण्याची मोठी संधी आहे. जर कृषी विभागाने अशा महोत्सवांना स्पर्धात्मकता आणि रोजगाराची जोड दिली, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागेल आणि निसर्गाचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत जिवंत राहील.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers