पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : आगामी काळात येऊ घातलेले ईद-ए-मिलाद, दहीहंडी उत्सव आणि श्री गणेशोत्सव हे सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी सायंकाळी शहरात मुख्य मार्गांवरून दणकेबाज रुटमार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या पथसंचालनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
रविवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०५ ते ५.४५ या वेळेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुटमार्च आयोजित करण्यात आला होता. जुने पोलीस स्टेशन येथून रुटमार्चला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशीद, टेबल लँड कॉर्नर, राहिल प्लाझा, मध्यवर्ती एस. टी. स्टँड असा प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने पोलीस स्टेशन येथे रुटमार्चची सांगता झाली.
पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी शहरात सणासुदीच्या काळात स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची देखील मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या पथसंचालनात १ पोलीस अधिकारी, १८ पोलीस अंमलदार, १७ होमगार्ड आणि ८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) जवान असा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता.
उत्सवाच्या काळात सर्वांनी जातीय सलोखा आणि बंधुभाव जपत सहकार्य करावे, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाचगणी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांच्या या संथ पण दणकेबाज रुटमार्चमुळे शहरवासीयांमध्ये शिस्त आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.



