पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड/सातारा : मॉडिफाय सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करत रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टारगना आता सातारा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सातारा जिल्हा वाहतूक शाखा, सातारा शहर आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तपणे मोहीम राबवून एकाच वेळी धडक कारवाई केली. विशेष म्हणजे, या मोहिमेत जप्त केलेले तब्बल २८१ मॉडिफाय सायलेन्सर कराडमधील विद्यानगर आणि साताऱ्यातील पोवई नाका येथे बुलडोझरखाली चिरडून लोकांदेखत नष्ट करण्यात आले. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गाड्यांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणे, बेकायदेशीर सायरन अथवा प्रेशर हॉर्न वाजवून नागरिकांना नाहक त्रास देणे आणि अक्षरे नीट न दिसणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट वापरण्याचे प्रमाण वाढले होते. या आवाजाच्या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलीस प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली.
या धडक कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एक-दोन नव्हे, तर तब्बल ६७७ प्रकरणांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये मॉडिफाय सायलेन्सरचे २८१, फॅन्सी नंबर प्लेटचे १७०, प्रेशर हॉर्नचे १८३ आणि सायरन वापरणाऱ्या ४३ वाहनांचा समावेश आहे. केवळ दंड वसूल करून वाहने सोडण्याऐवजी, ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरणारे सायलेन्सर थेट रस्त्यावर बुलडोझर घालून नष्ट करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखा आणि शहर वाहतूक शाखेने समन्वयाने एकाच वेळी अशा प्रकारची मोठी कारवाई करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ ठरली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे आणि सातारा वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
गाड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. सायलेन्सर जप्त करून ते जागीच नष्ट केले जातील आणि चालक-मालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



