पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डिजे आणि डॉल्बीबाबत प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केल्यास कोणालाही अडचण होणार नाही. डिजेला पूर्णपणे बंदी असणार नसून त्याच्या डेसिबलची मर्यादा असली पाहिजे, याबाबतची सर्व आदेश असून प्रशासनाच्या सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करावे व शांततामय आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, अशा प्रकारचे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे सध्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले.
कराडला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराड शहर पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड तालुका पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, मलकापूर नगराध्यक्ष तेजस सोनवणे यांच्यासह कराड व मलकापूरचे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सर्व गणेशोत्सव मंडळांनी व गणेशभक्तांनी गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात व आनंदात साजरा करावा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले की, गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाशी यापूर्वी चर्चा केली आहे. प्रशासकडून मंडळांना डॉल्बी वापराबाबत व आवाजाच्या मर्यादेबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. उत्सवावेळी लावल्या जाणाऱ्या स्पीकरमध्ये ज्या ज्या गोष्टी मॉडिफाय केल्या जाणार ते साहित्य जप्त पोलीस प्रशासनाकडून जप्त केले जाणार आहे. वास्तविक मुद्दा हा डीजे किव्हा डॉल्बीचा नसून आवाजाच्या मर्यादेचा आहे. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल हे विसरू नये. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा सर्व गणेशोत्सव मांडले प्रशासनाच्या नियमाचे पालन करून साजरा करतील असे पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी सांगितले.
यावेळी मलकापूरचे नगरसेवक दादा शिंगण यांनी प्रशासन गणेशोत्सव आल्यावरच डॉल्बी व डीजे विरोधात जागे का होते? इतरवेळी का होत नाही. तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी एका दिवसात टपरी बंद करू शकतात तर मग जिल्ह्यातील अधिकारी, प्रशासन का करू शकत नाही? अशा सवाल शिंगण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विचारत डॉल्बी विरोधात सर्व मंडळे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, राहुल यादव, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सागर आमले, कैलास पिसाळ, रणजितनाना पाटील, भूषण जगताप, जयंत बेडेकर, आनंदराव लादे, भाजपचे गटनेते विजय वाटेगावकर , माजी नगरसेविका स्मिता हुलवान, माजी नगरसेवक फारुख पटवेकर यांच्यासह नागरिकांनी यावेळी शांतता समितीच्या बैठकीत चर्चेत प्रश्न उपस्थित करत सहभाग घेतला.



