पांचगणी न्यूज नेटवर्क
कुंभारोशी : महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमधील अत्यंत संवेदनशील अशा पोलादपूर-महाबळेश्वर ‘आंबेनळी घाटा’तील सर्व प्रकारची वाहतूक आजपासून (३ जुलै) ६ जुलै २०२६ पर्यंत पुढील चार दिवस पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी रायगडचे जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी आज हा अत्यंत महत्त्वाचा आपत्कालीन घाटबंदीचा आदेश जारी केला आहे.
आंबेनळी घाट परिसर हा अत्यंत तीव्र उतार, खोल दऱ्या आणि खचणारे भूस्तर यामुळे भूस्खलन व दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता, प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पुढील ४ दिवस घाटातील वाहतूक पूर्ण बंद राहण्यासोबतच, आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात ‘ऑरेंज’ किंवा ‘रेड’ अलर्ट घोषित केला जाईल, त्यावेळी हलक्या वाहनांनाही या मार्गावर पूर्ण बंदी असेल. तसेच संपूर्ण पावसाळाभर सुरक्षिततेच्या कारणास्तव या घाटातून रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
सध्या या महामार्गावर विविध सुरक्षा सुधारणा, संरक्षण भिंती आणि क्रॅश बॅरिअर्स उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रतिकूल हवामानात प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलादपूरचे तहसीलदार आणि रायगड पोलीस अधीक्षकांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे असतील पर्यायी मार्ग:
घाटबंदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. कोकणातून सातारा-पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी माणगाव-ताम्हाणी घाट मार्गे पुणे-सातारा अथवा पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



