Home » पांचगणी » ‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल’चे दिमाखात उद्‌घाटन साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांची पर्वणी; पहिल्याच दिवशी पर्यटकांची तोबा गर्दी

‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल’चे दिमाखात उद्‌घाटन साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांची पर्वणी; पहिल्याच दिवशी पर्यटकांची तोबा गर्दी

पांचगणी, ता. २७ : नभांगणात उंच भरारी मारणारे पॅराग्लायडर्स, सुमधुर गीतांचा आस्वाद, चटकदार पदार्थांची मेजवानी आणि रसिकांना ठेका धरायला लावणारे नृत्याविष्कार अशा उत्साही वातावरणात ‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल २०२६’ चे संजीवन विद्यालयाच्या शरद पंडित स्टेडियमवर दिमाखात उद्‌घाटन झाले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिक आणि देशभरातून आलेल्या पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तोबा गर्दी केली.

​महोत्सवाचे उद्‌घाटन पांचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे, उद्योजक राजेंद्र माने, मुख्याधिकारी पंडित पाटील, घाटजाई नगर विकास आघाडीचे प्रमुख शेखर कासुर्डे, सपोनी दिलीप पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप बगाडे म्हणाले, की जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र आणि पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेल्या पांचगणीला या महोत्सवाने वेगळी उंची मिळवून दिली आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळते आणि पर्यटकांनाही निसर्गाच्या सानिध्यात एक अविस्मरणीय सांस्कृतिक व साहसी अनुभूती मिळते.

​तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात साहसी खेळ, लहान मुलांसाठी विशेष खेळणी, संगीत रजनी आणि खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. याशिवाय जगप्रसिद्ध टेबल लँड पठारावर खास पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिव्हल कमिटीचे अध्यक्ष किरण पवार यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरीचे माजी अध्यक्ष दिवंगत सुनील कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनी बहारदार गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्यास नगरसेवक प्रकाश गोळे, राजेंद्र पारठे, नारायण बिरामणे, राजश्री सणस, परवीन मेमन, महेश खांडके, अमित कांबळे, विमल भिलारे, शिल्पा माने, स्वाती कांबळे, सुप्रिया माने, अमृता गोळे, गणेश कासुर्डे, प्रवीण बोधे यांच्यासह लक्ष्मी कऱ्हाडक, वैभव कऱ्हाडकर, अभिलाषा कऱ्हाडकर, प्रसाद कारंजकर, विविध शाळांचे प्रतिनिधी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, फेस्टिव्हल कमिटीचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यटकांची अलोट गर्दी

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पांचगणीकर आणि वीकेंडसाठी आलेल्या पर्यटकांनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती. सायंकाळनंतर रंगलेल्या संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांचा हजारो रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला. यामुळे पांचगणीच्या पर्यटन व्यवसायात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers