Home » पांचगणी » पाचगणी पोलिसांचा गौरव; डायल ११२, दोषसिद्धी व उत्कृष्ट चालकाचा सन्मान

पाचगणी पोलिसांचा गौरव; डायल ११२, दोषसिद्धी व उत्कृष्ट चालकाचा सन्मान

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी, ता. २७ : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण, गुन्ह्यांना वचक आणि आपत्कालीन प्रसंगी दाखवलेली तत्परता या त्रिसूत्रीमुळे पांचगणी पोलीस ठाण्याने सातारा जिल्हा पोलीस दलात मानाचा तुरा रोवला आहे. डायल ११२ च्या कॉलवर तात्काळ कारवाई करत एका महिलेची सुखरूप सुटका केल्याबद्दल, विविध गुन्ह्यांत ठणठणीत शिक्षा सुनावण्यात यश मिळवल्याबद्दल तसेच उत्कृष्ट चालक पुरस्काराच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी पांचगणी पोलिसांचा गौरव केला आहे.

​भोसे ते भिलार मार्गावर एमएच-११-केक्यू-९६६३ या वाहनातून एका महिलेस दोरखंडाने बांधून जबरदस्तीने नेले जात असल्याची माहिती ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.१४ वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वर प्राप्त झाली होती. माहिती मिळताच पांचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचा संपर्क क्रमांक मिळवून लोकेशन शोधण्यात आले आणि खिंगर गावच्या हद्दीत संबंधित वाहन व महिलेस ताब्यात घेण्यात आले. चौकशीत पती-पत्नीतील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले; त्यानंतर पोलिसांनी महिलेस सुरक्षितपणे तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. कोणताही अनुचित प्रकार न घडता तातडीने कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार विजय चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार संजय थोरवे, पोलीस हवालदार तानाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव, अमित कुंभार, अमोल जगताप आणि डायल ११२ च्या महिला पोलीस नाईक रूपाली जाधव यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवले.

​पाचगणी पोलीस ठाण्यात मद्यप्राशन करून वाहन चालवणे, उघड्यावर मद्यपान, दारू बाळगणे व वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान तसेच वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने वाहन उभे करणे यांसारख्या विविध गुन्ह्यांतील एकूण १२ प्रकरणांत आरोपी दोषी आढळले आहेत. महाबळेश्वरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संबंधित आरोपींना एकूण ७२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा व भक्कम पुराव्यांमुळे या गुन्ह्यांत दोषसिद्धी साधण्यात पोलिसांना यश आले आहे.

​दरम्यान, दैनंदिन कर्तव्यातील शिस्त, जबाबदारी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) बंदोबस्तादरम्यान कोणताही अपघात न होऊ देता शासकीय वाहनाची उत्कृष्ट देखभाल राखल्याबद्दल पांचगणी पोलीस ठाण्यातील चालक सहाय्यक फौजदार संजय थोरवे यांची जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी सातारा जिल्ह्यातील ‘उत्कृष्ट चालक’ म्हणून निवड झाली आहे. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले असून, पांचगणीतील या तिहेरी यशाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

 

​चौकट

डायल ११२ चा खरा हेतू साध्य

आपत्कालीन क्षणी नागरिकांच्या हाकेला तातडीने प्रतिसाद देणे आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न वेळीच रोखणे, हा महाराष्ट्र आपातकालीन प्रतिसाद प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. भोसे-भिलार ते खिंगर दरम्यान घडलेल्या घटनेत पांचगणी पोलिसांनी दाखवलेला प्रसंगावधान व वेग यामुळे हा हेतू यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे जिल्हा पोलीस दलाकडून अधोरेखित करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers