पाचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू, अनुभवी आणि नेतृत्वगुण असलेले, समाजप्रिय ज्ञानदेव रांजणे यांची निवड झाल्याबद्दल जावळी तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने जावळीची राजधानी मेढा येथे त्यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. या बँकेचे संचालकपद म्हणजे तालुक्याचे मिनी आमदार पद असं समजलं जातं. ज्ञानदेव रांजणे यांना जावळी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. ज्ञानदेव रांजणे यांच्या निवडीमुळे जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
जावळी तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने ज्ञानदेव रांजणे यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले, “हा विजय माझा नसून नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजसाहेब यांचा आहे. उमेदवारीसाठी ज्ञानदेव रांजणे हे केवळ नाव होते परंतु खरे उमेदवार महाराज साहेबच होते. त्यांच्यावरील निष्ठेमुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या निष्ठेचाच हा विजय आहे.”
या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. जावली तालुक्यातील विविध विकास संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ, सभासद आणि गटसचिव यांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, सहकार क्षेत्रामध्ये काम करताना सभासद, शेतकरी, विकास सेवा सोसायट्या आणि सामान्य जनतेच्या अडचणींची जाणीव असणे आवश्यक आहे. ज्ञानदेव रांजणे यांना सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव असून, त्यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील विविध विकास सेवा सोसायट्यांचे प्रश्न जिल्हा बँकेच्या स्तरावर प्रभावीपणे मांडले जातील. गटसचिवांच्या अडीअडचणी, संस्थांचे कामकाज, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा तसेच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी ते निश्चितच सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जावळी तालुक्याच्या सहकार क्षेत्राला जिल्हा बँकेच्या माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी व गटसचिव यांचे प्रश्न सोडविणे साठी नूतन संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या सत्कार सोहळ्यामुळे जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून ज्ञानदेव रांजणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर सत्कार सोहळ्या साठी युवा नेते सागर धनावडे,विभागीय विकास अधिकारी आर एल निकम, के के निकम, मोरावळे चेअरमन खामकर, सुभाष दादा शेलार,सर्व विकास अधिकारी, जावळी तालुकां गटसचिव संघटनेचे सर्व पदाधिकारी, व सर्व सचिव उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामदास पार्टे यांनी केले तर आभार दीपक महामुलकर यांनी मानले.



