पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह) महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील गावठाण हद्दीबाहेरील बांधकामांच्या नमुना ८-अ मधील नोंदींवर प्रशासनाने लादलेली बंदी पूर्णपणे अन्यायकारक आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमीपुत्रांचे जगणे आणि हक्काचे छत्र उभारणे कठीण झाले असून, ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी भीषण परिस्थिती स्थानिक नागरिकांवर ओढावली आहे, अशा शब्दांत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी प्रशासकीय निर्णयाविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. या निर्णयाविरोधात लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तीव्र गाऱ्हाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसर केंद्र शासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला असला, तरी गेल्या अनेक वर्षांत शासनाने वाढत्या लोकसंख्येनुसार गावठाण विस्तार दिलेला नाही. काळानुसार कौटुंबिक रचना बदलल्या, कुटुंबे विभक्त झाली आणि घरांची गरज वाढली. मात्र, शासन आणि प्रशासनाचे नियम अजूनही जुनेच आणि जाचक राहिले आहेत. नवीन घरे बांधायला परवानग्या मिळणे अत्यंत किचकट आणि दुरापास्त झाले आहे.
आत्तापर्यंत अनधिकृत का होईना, स्थानिक नागरिकांनी उभारलेल्या निवाऱ्यांची किमान ग्रामपंचायतीच्या नमुना ८-अ मध्ये नोंद तरी होत होती. त्यामुळे नागरिकांना एक आधार होता. परंतु, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे या नोंदींवरच थेट गदा आणली गेली आहे. शासनाच्या या तुघलकी धोरणामुळे स्थानिक भूमीपुत्रांनी नेमके करायचे काय आणि राहायचे कुठे, असा संतप्त सवाल राजेंद्र शेठ राजपुरे यांनी उपस्थित केला आहे.
पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याला स्थानिकांचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. मात्र, पर्यावरणाच्या नावाखाली मूळ रहिवाशांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणे योग्य नाही. त्यामुळे या अन्यायी निर्णयाच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील व्यावहारिक अडचणी, गावठाण विस्ताराचा प्रलंबित प्रश्न आणि ८-अ च्या नोंदींबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची ठाम मागणी केली जाणार आहे, असा विश्वास राजपुरे यांनी व्यक्त केला.



