पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ : एकता आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर शेतीत काय चमत्कार घडू शकतो, याचे आदर्श उदाहरण करंदोशी येथील महिलांनी घालून दिले आहे. येथील ‘विघ्नेश्वर सोयाबीन समूह’ आणि ‘नवलाई समूह’ या दोन्ही शेतकरी महिला गटांनी एकत्र येत गटशेती अंतर्गत तब्बल १०० लिटर जीवामृत तयार केले. इतकेच नव्हे तर, सर्व महिला सदस्यांनी एकत्रित कष्ट करत तब्बल ४० एकर शेती क्षेत्रावर अवघ्या एका दिवसात या जीवामृताची यशस्वी फवारणी करून गटशेतीची ताकद दाखवून दिली आहे. महिला बचत गटांच्या या कामगिरीचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी या दोन्ही समूहांनी मिळून १०० लिटर जीवामृत तयार करण्याचे नियोजन केले. हे जीवामृत शेतात पोहोचवण्यासाठी समूहातील सर्व महिलांनी सकाळी ८ वाजल्यापासून ते अगदी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अखंड परिश्रम घेतले. यामध्ये दोन्ही समूहांच्या निमंत्रक अश्विनी विजय धनवडे आणि कोमल गोरख शेडगे यांच्यासह संध्या महामुलकर, विजया महामुलकर, सुषमा मानकर, द्वारका महामुलकर, शिल्पा शेडगे, पुजा शेडगे, रुपाली महामुलकर, लक्ष्मी चिकने, कुसुम पारटे, शर्मिला महामुलकर, कविता धनावडे, सिंधू धनावडे, संगीता धनवडे, संगीता धनावडे, रोहिणी मामुलकर, सीमा धनावडे, दिपाली धनवडे, अश्विनी महामूलकर, जयश्री मामुलकर, मंगल पार्टे व चतुरा महामुलकर या सर्व महिला सदस्यांनी खांद्याला खांदा लावून दिवसभरात ४० एकर जमिनीवर ही फवारणी पूर्ण केली.
या संपूर्ण उपक्रमाला ‘फार्मर कप’ अंतर्गत पाणी फाउंडेशन, ‘उमेद’ अभियान आणि स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेषतः या समूहाचे मेंटर अल्पेश खरात आणि निलेश भोसले यांनी महिलांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देत जीवामृत निर्मितीसाठी प्रोत्साहित केले. महिला बचत गटांनी कृषी विभागाच्या साथीने राबवलेला हा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.



