Home » मेढा » ‘गाव तेथे शाखा’ अंतर्गत पहिला मान रिटकवली ने पटकवला

‘गाव तेथे शाखा’ अंतर्गत पहिला मान रिटकवली ने पटकवला

पांचगणी न्यूज नेटवर्क

मेढा :- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गाव तेथे शाखा उपक्रम सुरु केला आहे त्या उपक्रमाचा पहिला मान रिटकवली गावाने मिळवला.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जावळी तालुक्यातील पहिल्या गाव शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

जावळी तालुक्यात शेव चिवड्याचं गाव म्हणून ओळख असलेलं रिटकवली येथे झालेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्रजी पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील उपस्थित होते

तसेच विश्वभर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप अतुल महाराज देशमुख व व्यसनमुक्त युवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे मा.अध्यक्ष विलास बाबा जवळ, बाळासाहेब साळवी शंकरराव जांभळे,मराठा क्रांती मोर्चा सातारचे समन्वयक विवेकानंद बाबर, सातारा जिल्हा सरचिटणीस जितेंद्र भोसले, खंडाळा तालुका अध्यक्ष प्रवीण विर, अँड.तेजस घोरपडे जीवन पवार, तुकाराम यादव,अंकुश पवार,अमर सावंत, राकेश गायकवाड,शिल्पाताई गोळे,संगीता ताई वेंदे,छायाताई भोसले, लक्ष्मी ताई चिकणे, रिटकवलीच्या सरपंच शारदा मर्ढेकर यांच्या उपस्थितीत कार्यालय व शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे म्हणाले स्व.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज मराठा समाजाला आहे म्हणून ‘शेतजमिनी विकू नका; पुढील पिढ्यांसाठी जमीन जपा’ असेही ते म्हणाले

कार्यक्रमात ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या होत असलेल्या विक्रीबाबतही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. “शेतजमिनी विकू नका. जमिनीचे नैसर्गिक, व्यावसायिक आणि पर्यावरणीय मूल्य लक्षात घेऊन हाती असलेली जमीन जपा,” असे आवाहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आपल्या सामाजिक चळवळीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सन १९९० च्या दरम्यान एका गावात झालेल्या अन्यायाविरोधात रात्री नऊ वाजता मेढा पोलीस ठाण्यावर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रभाकर दुर्गे, रंगनाथ गोडगे पाटील, राजेंद्र थोरात, विठ्ठल खोपडे यांच्यासह पुण्याहून तब्बल ११० किलोमीटर स्कूटरवरून प्रवास करून मोर्चा काढल्याची आठवण त्यांनी सांगितली.

रिटकवली येथे सुरू झालेले हे कार्यालय जावळी तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुक्यातील पहिले कार्यालय असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे कार्यालय केवळ संघटनेच्या बैठकीपुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांसाठी मार्गदर्शन, संवाद आणि सहकार्याचे केंद्र बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची माहिती, शासनाच्या विविध योजना व सवलती, युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी, शेतकऱ्यांना विविध योजना, महिलांसाठी विविध उपक्रम तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू समाजबांधवांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

समाजातील आरक्षण, शैक्षणिक सुविधा, प्रशासकीय अडचणी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर योग्य माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. गावागावांत बैठकांचे आयोजन करून समाजातील सर्व घटकांना संघटित करण्याचा मानसही यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला .

यावेळी ह भ प अतुल महाराज देशमुख, व्यसनमुक्त युवक संघाचे विलास बाबा जवळ,मराठा क्रांती मोर्चा सातारा जिल्हा समन्वयक विवेकानंद बाबर, सातारा जिल्ह्याचे सरचिटणीस जितेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन केले

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने ‘गाव तेथे शाखा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, महाकाली मातेच्या आशीर्वादाने रिटकवली येथून जावळी तालुक्यात या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी काळात तालुक्यातील विविध गावांमध्ये शाखा स्थापन करून समाजातील युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मत जावळी तालुका अध्यक्ष सुनील आण्णा धनावडे यांनी व्यक्त केले.

जावळी तालुका सोशल मीडिया अध्यक्ष जितीन वेंदे, युवक अध्यक्ष पदी राजेश बेलोशे,उपाध्यक्ष पदी नामदेव मर्ढेकर (दक्षिण),कार्याध्यक्ष पदी अनिल केसकर ( दक्षिण ), कोशाध्यक्ष भगवान माने, संघटक श्रीकांत चिकणे,सचिव संकेत जुनघरे,सदस्य पदी काशिनाथ धनावडे यांची नियुक्ती करणेत आली.

यावेळी शामराव मर्ढेकर,पत्रकार अभिजित शिंगटे,छत्रपती संघटनेचे तालुका अध्यक्ष मोहन खुडे,जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गोळे, चंद्रकांत साळुंखे,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रिटकवली व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी यांनी केले उपस्थितांचे स्वागत तालुका अध्यक्ष सुनिल धनावडे तसेच आभार उपाध्यक्ष नामदेव मर्ढेकर यांनी मानले

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers