पांचगणी न्यूज नेटवर्क
दापवडी (प्रतिनिधी): जावली तालुक्यातील दापवडी आणि वहागाव परिसरात सध्या अज्ञात चोरट्यांनी आणि संशयित भुरट्यांनी धुमाकूळ घातला असून, यामुळे स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचाली आणि चोरीच्या घटनांमुळे दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी दापवडी आणि वहागावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दापवडी (ता. जावली) येथील शेतकरी मधुकर रांजणे आणि राजाराम कोंडीबा रांजणे यांच्या शेतातील बोअरवेलवरील मोटारींना जोडलेली तांब्याची महागडी विजेची वायर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लंपास केली. शेतीच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या वायर चोरीला गेल्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कामात मोठा खोळंबा निर्माण झाला आहे.
दरम्यान, चोरीच्या या घटनेसोबतच वहागाव आणि दापवडी परिसरात इतरही भितीदायक प्रकार घडल्याने घबराट वाढली आहे. काल रात्री धरणग्रस्त वहागाव येथील रहिवासी राजपुरे यांच्या घरावर अचानक अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. ऐन रात्रीच्या वेळी घराच्या छतावर दगड पडल्याने कुटुंबिय प्रचंड हादरले. त्याच रात्री दापवडी गावात एक अनोळखी संशयास्पद व्यक्ती घरांभोवती फिरताना आढळून आली. ही बाब लक्षात येताच परिसरातील महिलांनी प्रसंगावधान राखून आरडाओरडा केला. महिलांच्या आवाजाने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी त्या संशयित व्यक्तीचा पाठलाग केला; मात्र अंधाराचा गैरफायदा घेत तो पसार होण्यात यशस्वी झाला.
एकाच रात्री घडलेल्या या चोरीच्या आणि दगडफेकीच्या घटनांमुळे दापवडी व वहागाव परिसरातील महिला, वृद्ध आणि ग्रामस्थ कमालीचे दहशतीखाली आहेत. चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की, ते आता थेट वस्त्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या संशयित चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी एकमुखी मागणी दोन्ही गावांतील संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.



