Home » जावळी » जावळी तालुक्यात मुसळधार पावसाचे तांडव; महू धरण ओसंडले, काटवलीत घर कोसळून कुटुंब बेघर तर पाचगणी-काटवली घाटात रस्त्यांना नदीचे स्वरूप

जावळी तालुक्यात मुसळधार पावसाचे तांडव; महू धरण ओसंडले, काटवलीत घर कोसळून कुटुंब बेघर तर पाचगणी-काटवली घाटात रस्त्यांना नदीचे स्वरूप

पांचगणी न्यूज नेटवर्क
काटवली : गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता जावळी तालुक्याला झोडपून काढले आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळत असून नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. सततच्या अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील प्रसिद्ध महू धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून धरण क्षेत्रातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका जनजीवनाला बसला असून तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे.

​याच अतिवृष्टी दरम्यान जावळी तालुक्यातील काटवली गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काटवली येथील स्थानिक ग्रामस्थ तुकाराम श्रीपती बेलोशे यांचे राहते घर पूर्णपणे कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याने बेलोशे यांचे कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर आले असून हे कुटुंब पूर्णपणे बेघर झाले आहे. घरातील संसारोपयोगी साहित्याचे आणि धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा आणि बाधित बेलोशे कुटुंबाला शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व तात्पुरता निवारा मिळवून द्यावा, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

​दुसरीकडे, जावळी तालुक्यातील काटवली, दापवडी, करहर आणि हातगेघर परिसरालाही पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या भागातील शेत शिवारे पाण्याने पूर्णपणे तुडुंब भरली आहेत. आधीच पेरणी झालेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने उगवून आलेली पिके सडण्याची भीती निर्माण झाली असून पिकांच्या उगवण क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरणीची कामे खोळंबली असून शेतात पाणी साचल्यामुळे पेरणी कशी करावी, या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. पावसाचा हाच जोर कायम राहिला तर वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे.

​या नैसर्गिक संकटात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे. पाचगणी ते काटवली घाटातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारांची बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी योग्य साफसफाई न केल्यामुळे घाटातील सर्व पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत असल्याने घाटातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हेच घाटातील पाणी आता रस्त्याशेजारी असलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, प्रशासनाने तात्काळ या गटारांची स्वच्छता करून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers