Home » पांचगणी » तायघाटचा सुपुत्र सुहास भिलारे ठरला गावातील पहिला वकील! एलएलबी परीक्षेत घवघवीत यशाबद्दल शिवसेना व ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

तायघाटचा सुपुत्र सुहास भिलारे ठरला गावातील पहिला वकील! एलएलबी परीक्षेत घवघवीत यशाबद्दल शिवसेना व ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

पांचगणी न्यूज नेटवर्क

​भोसे  : दुर्गम व निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या तायघाट (ता. महाबळेश्वर) या छोट्याशा गावातील गुणी सुपुत्र सुहास भिलारे याने एलएलबी (LLB) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत वकिलीची पदवी प्राप्त केली आहे. तायघाट गावातील पहिला वकील होण्याचा मान पटकावून सुहासने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिवसेना आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने त्याचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

पांचगणी येथील अश्वटेक कॉम्पुटर अकॅडमी च्या सभागृहात झालेल्या ​या विशेष सत्कार सोहळ्याला शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख संभाजी भिलारे, जेष्ठ शिवसैनिक जी. के. आंब्राळे, शिवसेना पश्चिम विभाग नेते संभाजी जाधव, सुरेश मालुसरे सर, सुरेंद्र भिलारे, यांच्यासह परिसरातील नागरिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तायघाटसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुहासने मिळवलेले हे यश संपूर्ण तालुक्यासाठी भूषणावह ठरले आहे.

​या वेळी सुहास भिलारे यांचा नागरी सत्कार करताना शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांमध्ये अथांग बुद्धिमत्ता आणि कष्ट करण्याची तयारी असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड. सुहास भिलारे! तायघाटसारख्या गावातून पहिला वकील घडणे ही संपूर्ण परिसरासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि दुधात साखर पडल्यासारखी गोष्ट आहे. वकिलीच्या या सनदेचा उपयोग सुहासने समाजातील शोषित, वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा. त्याचा हा यशस्वी प्रवास गावातील इतर तरुण-तरुणींसाठी उच्च शिक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल.”

​सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित वकील ॲड. सुहास भिलारे भावुक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “माझ्या या यशामध्ये माझे कुटुंब, गावकरी आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक हितचिंतकाचा मोठा वाटा आहे. कायद्याचे ज्ञान ही केवळ एक पदवी नसून, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे एक प्रबळ माध्यम आहे. आपल्या भागातील नागरिकांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी आणि न्यायाची पायरी चढताना त्यांना खंबीर पाठबळ देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. मिळालेल्या या यशाचे चीज करत वकिली व्यवसायाच्या माध्यमातून निष्पक्षपणे समाजसेवा करणे हेच माझे मुख्य ध्येय असेल.”

​या वेळी उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांनी ॲड. सुहास भिलारे यांच्या भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान अश्वटेकच्या वतीने सर्व पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers