पाचगणी :
महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य गोडवली गावात काल रात्री चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घालत धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी एका घराबाहेर ठेवलेले तांब्याचे मौल्यवान साहित्य आणि तब्बल ६ वेगवेगळ्या विहिरींवरील पाण्याच्या मोटारींच्या तांब्याच्या वायर कापून पोबारा केला आहे. या एकाच रात्री घडलेल्या धाडसी चोऱ्यांच्या सत्रामुळे संपूर्ण गोडवली परिसरासह पाचगणी परिसरात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोडवली गावातील स्थानिक रहिवासी अशोक तुकाराम मालुसरे यांच्या गावठाणमधील घराबाहेर दैनंदिन वापरासाठी ठेवलेला तांब्याचा बंब, पाण्याचा हंडा आणि तांब्याची टाकी अशी लाखो रुपयांची मौल्यवान भांडी चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत लंपास केली. चोरट्यांचा सुळसुळाट एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी आपला मोर्चा थेट शेतकऱ्यांच्या शेता शिवाराकडे वळवला.
गावचे शेतकरी लक्ष्मण रामचंद्र मालुसरे यांच्या तीन वेगवेगळ्या विहिरींवरील मोटारींच्या तांब्याच्या वायर चोरट्यांनी कापून नेल्या. त्याचप्रमाणे शेजारीच शेती असणारे शेतकरी शैलेश संपत मालुसरे, सदाशिव मारुती मालुसरे आणि रामचंद्र कोंडीबा मालुसरे यांच्याही शेतातील विहिरींवरून पाण्याच्या मोटारची तांब्याची वायर चोरट्यांनी शिताफीने चोरून नेली.
एकाच रात्रीत घरातील भांडी आणि शेतातील मोटारींच्या वायर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच ऐन शेतीच्या हंगामात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात सध्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि या टोळीचा तात्काळ छडा लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी तीव्र मागणी गोडवली ग्रामस्थांकडून व शेतकऱ्यांकडून होत आहे.



