पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : शहरातील हातावरचे पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना आणि पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने आज, ‘पीएम स्वनिधी’ (प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी) योजनेअंतर्गत विशेष ‘लोककल्याण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शहरातील अनेक लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
मेळाव्यादरम्यान उपस्थित लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी योजनेच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये व्यवसायाला उभारी देण्यासाठी पहिल्या टप्प्यात १५,००० रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५,००० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५०,००० रुपयांच्या कर्ज योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शासनामार्फत सुरू करण्यात येणारी नवीन ‘क्रेडिट कार्ड’ योजना ठरली. ज्या लाभार्थ्यांचे ५०,००० रुपयांचे कर्ज सध्या सुरू आहे किंवा ज्यांनी या कर्जाची यशस्वी परतफेड केली आहे, अशा विक्रेत्यांसाठी हे क्रेडिट कार्ड अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या क्रेडिट कार्डची एकूण मर्यादा ३०,००० रुपयांपर्यंत असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात १०,००० रुपयांपर्यंतची मर्यादा दिली जाईल आणि वेळेवर व प्रामाणिकपणे परतफेड केल्यानंतर ही मर्यादा टप्प्याटप्प्याने ३०,००० रुपयांपर्यंत वाढवली जाईल.
याशिवाय, बदलत्या काळासोबत लाभार्थ्यांनी डिजिटल पेमेंटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. डिजिटल व्यवहारांवर भर देणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेमार्फत आकर्षक कॅशबॅकची सुविधा देखील दिली जाणार आहे.
केवळ आर्थिक मदतच नव्हे तर लाभार्थ्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियानांतर्गत विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये लाभार्थ्यांचे जनधन बँक खाते उघडणे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, जननी सुरक्षा योजना आणि मातृवंदना योजना यांसारख्या महत्त्वपूर्ण शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी कोणत्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि अर्ज कसा करावा, याबाबत पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद पीएम स्वनिधी विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली व लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
पाचगणी शहराचा मुख्य कणा असलेल्या या छोट्या व्यावसायिकांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीपभाऊ बागडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या वतीने करण्यात आले.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पाचगणी नगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



