पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील अंजुमन बस थांब्याजवळ आज एक भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा डंपर रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून, मोठी जीवितहानी टळली असली तरी या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित डंपर पाचगणीहून महाबळेश्वरच्या दिशेने जात होता. अंजुमन बस थांब्याच्या मागील बाजूस असलेल्या अत्यंत तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे हा अवजड डंपर रस्त्याच्या कडेला थेट पलटी झाला. अपघात होताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेतली. डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजुमन बस थांब्याजवळील हे तीव्र वळण आता अपघाताचे केंद्र बनू लागले आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या घाटरस्त्याच्या कडेला पुरेसा भराव टाकण्यात आलेला नाही, तसेच अनेक ठिकाणी आवश्यक असणारे मजबूत संरक्षण कठडे (क्रॅश बॅरिअर्स) नसल्याने वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्ते निसरडे झाले असून धुक्यामुळे समोरील रस्ता दिसणे कठीण होते, अशा स्थितीत या धोकादायक वळणांवर अपघातांची मालिका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
घाटातील अवजड वाहतूक आणि वेगावर मर्यादा आणणे गरजेचे झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने संरक्षण कठडे उभारावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेमुळे पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी वळणांवर आणि घाटाच्या अरुंद रस्त्यांवर वाहने चालवताना अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



