पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ग्लोबल वॉर्मिंग, सोशल मीडियाचे प्रभाव, मानसिक आरोग्य आणि आर्थिक साक्षरता अशा विविध आधुनिक व सामाजिक विषयांवर आपली मते प्रभावीपणे मांडली.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाले. या प्रसंगी सौ. स्वाती महेश बिरामणे व श्री. अजित सपकाळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांचे वक्तृत्व कौशल्य, विषयाची मांडणी आणि आत्मविश्वास या निकषांवर मूल्यमापन केले.
ही स्पर्धा ज्युनिअर, मिडल आणि सिनिअर अशा तीन गटांत घेण्यात आली. यामध्ये ज्युनिअर गटात निनाद कुलकर्णी (प्रथम), अंशिता बडेकर (द्वितीय), सार्थक पाटील (तृतीय) यांनी यश मिळवले. मिडल गटात अन्वी महाजन (प्रथम), दुर्गा त्रिमुखे (द्वितीय), गुरव अश्वभा मकरंद (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. तसेच सिनिअर गटात श्रावणी भुटे (प्रथम), मानसवी रामाणी (द्वितीय) आणि जान्हवी सपकाळ (तृतीय) यांनी यश संपादन केले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अथर्व बिरामणे, सचिव सौ. स्वाती महेश बिरामणे यांच्यासह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व परीक्षकांकडून विशेष कौतुक करून त्यांना गौरविण्यात आले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



