Home » पांचगणी » पावसाच्या सरींसोबत ‘सफाई मित्रांच्या’ सुरक्षिततेची आणि सन्मानाची जपणूक : पाचगणी नगरपरिषद व ‘हिलदारी’चा मान्सूनपूर्व विशेष उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

पावसाच्या सरींसोबत ‘सफाई मित्रांच्या’ सुरक्षिततेची आणि सन्मानाची जपणूक : पाचगणी नगरपरिषद व ‘हिलदारी’चा मान्सूनपूर्व विशेष उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव

पाचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी शहरात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अबाधित राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष मान्सूनपूर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत प्रतिकूल हवामानात आणि मुसळधार पावसातही अखंड सेवा देणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट, गमबूट यांसह विविध वैयक्तिक सुरक्षा साहित्याचे  मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

​पाचगणीचा उंचावरील परिसर आणि येथील धो-धो कोसळणारा पाऊस लक्षात घेता, स्वच्छता दूतांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे असते. याच भावनेतून या साहित्याचे वितरण करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून जून २०२६ या महिन्यात शहराच्या स्वच्छतेसाठी उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा “उत्कृष्ट सफाई मित्र पुरस्कार” देऊन विशेष गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती, कामातील सुरक्षितता, शिस्त, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा घेतलेला लाभ आणि प्रशिक्षण शिबिरांमधील सक्रिय सहभाग या निकषांच्या आधारे या पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आली.

​या सोहळ्याचे कौतुक करताना नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे म्हणाले की, “हिलदारी संस्थेच्या माध्यमातून शहरात राबवले जाणारे उपक्रम नेहमीच कौतुकास्पद असतात. सफाई कर्मचारी हे शहराचे खरे वैभव असून त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाला प्राधान्य देणे हे आपले कर्तव्य आहे.” कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा साधनांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.

​या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस, मुख्याधिकारी पंडित पाटील, सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून, पुरस्कारांमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही अधिक जोमाने काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers