Home » सातारा » पेटती चिता महापुरात गेली वाहून पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशी गावातील थरकाप उडवणारे वास्तव

पेटती चिता महापुरात गेली वाहून पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशी गावातील थरकाप उडवणारे वास्तव

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा : जिवंत असताना माणसाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो हे आपण रोजच पाहतो, पण मृत्यूनंतरही एका मृतदेहाच्या नशिबी अशी वेदनादायी विटंबना यावी? साताऱ्यातील ढोरोशी गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची पेटती चिता गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओढ्याच्या पुरात वाहून गेली. अंत्यसंस्कार अपूर्ण राहिले, इतकेच नव्हे तर साधे ‘अस्थी विसर्जन’ करण्यासाठी राखही शिल्लक उरली नाही. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने ग्रामीण भागातील अपुऱ्या सुविधांचा आणि प्रशासकीय उदासीनतेचा अत्यंत क्रूर चेहरा समोर आणला आहे.

ढोरोशी (ता. पाटण) येथील ज्येष्ठ नागरिक कै. साहेबराव मारुती मुळीक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओढ्यालगत असलेल्या गावच्या तात्पुरत्या स्मशानभूमीत पार्थिव नेण्यात आले. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुलाने वडिलांना मुखाग्नी दिला. चितेने नुकताच पेट घेतला होता आणि अचानक निसर्गाने रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे शेजारच्या ओढ्याला क्षणार्धात महापूर आला. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पेटती चिता विझली आणि अर्धवट जळालेले पार्थिव लाकडांसह पुरात वाहून गेले. उपस्थित जनसमुदाय हताशपणे हा भयानक प्रसंग पाहत होता, पण पाण्याच्या वेगापुढे कोणाचेच काही चालले नाही.

परवा ‘रक्षा विसर्जन’, पण नदीत वाहून न्यायला अस्थीच उरल्या नाहीत!

या घटनेतील सर्वात वेदनादायी आणि डोळ्यात पाणी आणणारी बाब म्हणजे, हिंदू धर्माच्या परंपरेनुसार परवा मृत व्यक्तीचा ‘रक्षा विसर्जनाचा’ (अस्थी गोळा करण्याचा) विधी आहे. परंतु, जिथे चिताच वाहून गेली, तिथे विसर्जन करायचे काय? हा उद्विग्न करणारा प्रश्न आज मुळीक कुटुंबासह संपूर्ण गावाला छळत आहे. आपल्या प्रिय माणसाला शेवटचा निरोपही सन्मानाने देता आला नाही, या दुःखाचे ओझे घेऊन हे कुटुंब जगत आहे.

प्रशासकीय उदासीनतेचा बळी: ग्रामपंचायतीचे प्रस्ताव धूळ खात?

ढोरोशी ग्रामपंचायतीने डी.पी.डी.सी.च्या (DPDC) जनसुविधा योजनेतून सुरक्षित व सुसज्ज स्मशानभूमीसाठी अनेकदा निधीची मागणी केली होती, अनेक प्रस्ताव सादर केले होते. मात्र, लालफितीच्या कारभारात हे प्रस्ताव रखडले. सध्या स्मशानभूमीसाठी हक्काची जागा खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतीने नव्याने प्रस्ताव दिला आहे. आता तरी जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का, की प्रशासन आणखी एखाद्या अशाच दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल ढोरोशीकर विचारत आहेत.

पालकमंत्र्यांच्याच तालुक्यात ‘हदय पिळवटून टाकणारी घटना ‘
तालुक्यापासून ते राज्याच्या सत्तासंघर्षात नेहमीच केंद्रस्थानी राहिलेल्या सातारच्या वजनदार पालकमंत्र्यांच्या स्वतःच्या तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गावात सुसज्ज स्मशानभूमी असावी या साध्या मागणीकडेही प्रशासनाने आजवर दुर्लक्ष केले. आता या ऐतिहासिक विटंबनेनंतर तरी पालकमंत्र्यांचे प्रशासन जागे होणार का? की केवळ आश्वासनांची मलमपट्टी केली जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘आदर्श गावा’च्या कपाळावर प्रशासकीय अनास्थेचा डाग!

डोंगरकुशीत वसलेले ढोरोशी हे गाव ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात’ उल्लेखनीय कामगिरी करणारे गाव आहे. लोकसहभागातून विकास आणि पर्यटन स्थळ बनू पाहणारी आदर्श शाळा यामुळे या गावाने राज्यात नावलौकिक मिळवला. परंतु, अशा कौतुकास्पद गावात ‘पेटती चिता वाहून जाण्याची’ राज्यातील कदाचित पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे. एका बाजूला डिजिटल आणि आदर्श गावाची स्वप्ने पाहायची आणि दुसऱ्या बाजूला अंत्यसंस्कारासाठी छप्पर नसणे, हा विरोधाभास चीड आणणारा आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers