पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘हॅरिसन फॉली’ (थापा पॉईंट) या वादग्रस्त जमिनीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत कारवाई केली होती. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३’ च्या कलम १६४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून, स.नं. १० मधील ६.९१ हेक्टर क्षेत्र सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाचा हा कडक आदेश आता केवळ कागदावरच उरल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या सील केलेल्या जागेत पर्यटकांची राजरोस वर्दळ सुरू असून, रात्रीच्या वेळी तर हा परिसर मद्यपी तरुणांच्या पार्ट्यांचा मुख्य अड्डा बनत चालला आहे.
दांडेघर येथील स.नं. १० ही जमीन श्री केदारेश्वर देवस्थान ईनाम वर्ग ३ ची मिळकत असून, याच्या ताब्यावरून दांडेघर ग्रामस्थ मंडळ आणि सुहास वाकडे यांच्यात प्रदीर्घ काळापासून वाद सुरू आहे. स्थानिक पातळीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचगणी पोलिसांच्या अहवालानंतर तहसीलदारांनी या जागेत व्यावसायिक क्रियाकलाप, टोल वसुली आणि बांधकामास तूर्तास पूर्णपणे बंदी घालत जागा सील केली होती. परंतु, सध्या या ठिकाणी शासकीय आदेशाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मुख्य रस्त्यावर बिनधास्त गाड्या पार्क करून पर्यटक निवांतपणे प्रतिबंधित क्षेत्रात फिरत आहेत. यामध्ये लहान मुले, महिला आणि प्रेमी युगुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
या गंभीर परिस्थितीवर थापा पॉईंटचे केअरटेकर गोविंद येवले यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तहसीलदारांच्या ज्या आदेशाविरोधात आमचा कायदेशीर लढा सुरू आहे, त्या आदेशानंतर प्रशासनाने या जागेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे,” असा आरोप येवले यांनी केला.
दरम्यान दांडेघरचे ग्रामस्थ अजित कळंबे यांना या विषयी विचारले असता त्यांनी ज्या अर्थी शासनाने दोन्ही पक्षकारांना या वादग्रस्त जागेत जाणेस बंदी घातली आहे. शासनाने रीतसर सील केले आहे तर याचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष घालावे.
संबंधितानी हे आमच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे तरीसुद्धा जर सील असूनसुद्धा इतर कुठून पर्यटक अथवा कोण आता या वादग्रस्त जागेत प्रवेश करीत असल्यास आम्ही दखल घेऊन रीतसर कारवाई करू
– सचिन म्हस्के, तहसीलदार महाबळेश्वर



