पांचगणी न्यूज नेटवर्क
कुडाळ : हंगामापूर्वीच निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाला आता चोरट्यांच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी आणि वाई तालुक्याच्या सीमेवरील कुडाळ (सावंतवाडी फाटा) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतातून सुमारे २५ हजार रुपये किमतीची स्ट्रॉबेरीची रोपे चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणीच्या डोंगरमाथ्यावरील अनेक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी कमी पावसाच्या प्रदेशात, म्हणजेच जावळी व वाई तालुक्यातील विविध गावांमध्ये खंडाने (भाड्याने) जमिनी घेऊन स्ट्रॉबेरीच्या दर्जेदार रोपांची लागवड करत असतात. साधारणपणे मे आणि जून महिन्यांच्या दरम्यान ही ‘मदर प्लांट’ (मूळ रोपे) लावली जातात. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या रोपांपासून तयार झालेली नवीन पिल्लू रोपे पिशवीत भरून मुख्य लागवडीसाठी नेली जातात. या काही महिन्यांत शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे या रोपांची निगराणी राखत असतो.
डोंगरमाथ्यावरील तळेमाळ येथील शेतकरी दिलीप हिरवे यांनीही याच आशेने कुडाळ येथील सावंतवाडी फाट्याजवळील शिवारात सुमारे एक एकर क्षेत्रावर ‘विंटर डाऊन’ या उच्च दर्जाच्या जातीची जवळपास ४०० मदर प्लांट लावली होती. यासाठी त्यांनी आतापर्यंत सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च केला होता. अवघ्या एक महिन्यानंतर ही रोपे काढून पिशव्यांमध्ये भरण्यासाठी तयार होणार होती. म्हणजेच या मदर प्लांटपासून लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी हजारो नवीन रोपे शेतकऱ्याला मिळणार होती.
मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या तयार होत आलेल्या रोपांवर डल्ला मारला आणि हिरवे यांच्या कष्टावर पाणी फेरले. या चोरीमुळे दिलीप हिरवे यांचे हंगामापूर्वीच लाखो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. एका बाजूला मशागत, खते आणि पाण्याचा वाढता खर्च सोसून शेतकऱ्याने उभे केलेले पीक अशा प्रकारे चोरीला गेल्याने शेतकऱ्याच्या पाठीवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या घटनेमुळे कुडाळ व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. शेतातील पिके आणि रोपेच जर सुरक्षित नसतील, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या परिसरातील वाढत्या चोऱ्यांच्या सत्राला आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्या त्या अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
प्रतिक्रिया..
“रात्रंदिवस मेहनत करून, पदरचे पैसे खर्च करून ही रोपे जगवली होती. महिनाभरात यातून मुख्य लागवडीसाठी हजारो रोपे तयार झाली असती. पण तयार होण्यापूर्वीच चोरट्यांनी त्यावर डल्ला मारल्याने माझे आर्थिक कंबरडे मोडले आहे.”
– दिलीप हिरवे, पीडित शेतकरी



