पाचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे मुसळधार पावसामुळे एका हॉटेलची २५ फुटांपेक्षा जास्त उंच असलेली संरक्षण भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जोगेश्वरी माता मंदिराकडे जाणाऱ्या जुना गावठाण परिसरातील तीव्र उतारावर घडली. सुदैवाने ही दुर्घटना रात्रीच्या वेळी घडल्याने आणि तिथे कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, हॉटेल प्रशासनाच्या या कथित निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
भिलार आणि महाबळेश्वर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ‘वंडरमिस्ट’ हॉटेलची भव्य दगडी भिंत अचानक कोसळली. भिंतीसह शेकडो टन दगड, माती आणि बांधकामाचा मलबा थेट मुख्य रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे ठप्प झाला होता. घटनेची माहिती मिळताच जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य प्रवीण भिलारे यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची गांभीर्याने पाहणी करत, स्थानिक नागरिकांच्या मदतीने रस्त्यावरील ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. तसेच, धोका लक्षात घेता “नागरिकांनी सध्यातरी या रस्त्यावरून ये-जा करू नये,” असे जाहीर आवाहन भिलारे यांनी केले आहे.
हा रस्ता अत्यंत तीव्र उताराचा आणि भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी मोठी दगडी भिंत बांधणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखेच होते, अशी प्रतिक्रिया आता उमटत आहे. “एवढ्या तीव्र उतारावर दगडी बांधकामाऐवजी मजबूत आरसीसी (RCC) संरक्षण भिंत उभारणे कायदेशीर आणि सुरक्षेच्या दृष्टीने बंधनकारक होते. मात्र, हॉटेल मालकाने याकडे दुर्लक्ष केले,” असा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
जोगेश्वरी माता मंदिराकडे जाणारा हा मार्ग गावातील शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन वापराचा मुख्य रस्ता आहे. “ही दुर्घटना जर शाळा सुटण्याच्या वेळी किंवा वर्दळीच्या वेळी घडली असती, तर अनेक निष्पाप जीवांचे नुकसान झाले असते. मग या जीवितहानीची जबाबदारी हॉटेल मालकाने घेतली असती का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी या ठिकाणी तात्काळ दर्जेदार ‘आरसीसी’ (RCC) संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी भिलारमधील नागरिकांकडून केली जात आहे.



