पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर | जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांची ‘पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुनील शिंदे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावी नेतृत्व, अभ्यासू भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची दखल घेऊनच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे महाबळेश्वरच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रात कमालीचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाबळेश्वरसारख्या संवेदनशील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पर्यटन क्षेत्राचा विकास करताना सुनील शिंदे यांनी नेहमीच दूरदृष्टी ठेवून काम केले आहे. “पर्यटन वाढीसोबत पर्यावरण संवर्धन” हा मूलमंत्र जपत त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील अंतर्गत रस्ते, अद्ययावत पर्यटन सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, सातत्यपूर्ण पाणीपुरवठा आणि मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण यांसारख्या पायाभूत कामांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. केवळ प्रशासकीय स्तरावर न थांबता थेट जनतेशी नाळ जोडणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे.
सुनील शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात राज्य शासन, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधींशी उत्तम समन्वय साधून महाबळेश्वरसाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला. महाबळेश्वरची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून असल्याने व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, घोडेवाले, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुवर्णमध्य साधत त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला नेहमीच बळकटी देण्याचा प्रयत्न केला. नुकतीच झालेली मुख्य बाजारपेठेची सुशोभीकरण मोहीम, शहरातील स्वच्छता अभियान, तसेच नागरिकांच्या गरजेसाठी तातडीने नवीन शववाहिनी उपलब्ध करून देणे, यांसारख्या अनेक लोकोपयोगी कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची आणि विश्वासाची भावना आहे. “महाबळेश्वर हे केवळ फिरण्याचे ठिकाण न राहता स्थानिकांच्या भविष्यासाठी सर्वसुविधायुक्त आणि सक्षम शहर व्हावे,” ही त्यांची भूमिका नेहमीच दिशादर्शक ठरली आहे.
आता पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाचा कश विस्तीर्ण स्तरावर पाहायला मिळणार आहे. महाबळेश्वर आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न, पर्यटन विकासातील अडचणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न थेट राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे मांडण्याची मोठी संधी त्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगरपरिषदांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांसाठी ते सक्षमपणे आवाज उठवतील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या या गौरवपूर्ण निवडीबद्दल महाबळेश्वर परिसरातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात येत आहे. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या एका कटिबद्ध आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेला हा योग्य सन्मान आहे, अशा भावना महाबळेश्वरच्या जनतेतून व्यक्त होत आहेत.



