Home » सातारा » महावितरणचा निष्काळजीपणा दोन जीवांवर बेतला! शेळीला वाचवताना विजेचा शॉक लागून आजीसह १३ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

महावितरणचा निष्काळजीपणा दोन जीवांवर बेतला! शेळीला वाचवताना विजेचा शॉक लागून आजीसह १३ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू

माण तालुक्यातील मार्डी येथील हृदयद्रावक घटना; महिनाभरापासून तुटलेल्या तारेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

​पांचगणी न्यूज नेटवर्क

मार्डी |: महावितरण कंपनीच्या अक्षम्य आणि जीवघेण्या निष्काळजीपणामुळे माण तालुक्यातील मार्डी येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि चटका लावून जाणारी घटना घडली आहे. वीज प्रवाह सुरू असलेल्या तुटलेल्या तारेत पाय अडकल्याने तडफडणाऱ्या शेळीचा जीव वाचवण्यासाठी गेलेला नातू आणि त्याला वाचवण्यास धावलेली आजी, या दोघांचाही विजेचा जोरदार शॉक लागून जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दीडच्या सुमारास मार्डी येथील काळेवस्तीजवळ असलेल्या बेंद शिवारात ही काळीज हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. सौ. मालन विलास काळे (वय ६०) आणि सुजित युवराज काळे (वय १३) अशी मृत आजी-नातवाची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मार्डी येथील काळेवस्ती आणि शिंदेवस्ती परिसराजवळ मालन काळे या आपल्या नातवासोबत नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी बेंद शिवारात गेल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास शेळ्या चरत असताना, एका शेळीचा पाय जमिनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारेत अडकला. या तारेत महावितरणचा हाय व्होल्टेज विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळीला जोराचा झटका बसला आणि ती जागेवरच तडफडू लागली. आपल्या डोळ्यांदेखत शेळीला मरणयातना होताना पाहून १३ वर्षांचा निष्पाप सुजित काळे तिला वाचवण्यासाठी धावला. मात्र, शेळीला हात लावताच सुजितलाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो त्या जिवंत तारेला चिकटून तडफडू लागला.

​नातवाला मृत्यूच्या दारात पाहून आजी मालन काळे यांचे मातृत्व जागे झाले. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सुजितला ओढून बाजूला करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुर्दैवाने, विद्युत प्रवाहाचा वेग इतका मोठा होता की आजीलाही वीज वाहिनीने आपल्या विळख्यात घेतले. अवघ्या काही सेकंदांत शेळीसह आजी आणि नातवाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

​या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ज्यावेळी ग्रामस्थ तिथे पोहोचले, तेव्हा नातवाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडणाऱ्या आजीचा आणि नातवाचा मृतदेह हातात हात असलेल्या अवस्थेत आढळून आला. हे विदारक दृश्य पाहून उपस्थितांना आपले अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांनी पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

​या भीषण अपघातानंतर मार्डी परिसरातील नागरिकांमधून महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. काळेवस्तीजवळच्या विजेच्या खांबावरील ही वीज वाहक तार गेल्या महिनाभरापासून तुटून पडलेली होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात कळवले होते. “जर वेळेत ही तार जोडली असती किंवा वीज पुरवठा खंडित केला असता, तर आज आजी-नातवाचे प्राण वाचले असते,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरणच्या या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळेच दोन निरपराध जीवांना प्राणाला मुकावे लागल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers