पांचगणी न्यूज नेटवर्क
मेढा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मेढा आगाराचा कारभार दिवसेंदिवस अधिकच बेशिस्त आणि प्रवाशांविरोधी होत चालल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना सातारा उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
पाचवड–पाचगणी मार्गावरील बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. सुमारे ८० टक्के बसफेऱ्या नियोजित वेळेनुसार धावत नसल्याने विद्यार्थी, नोकरदार, कामगार, शेतकरी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा सलग दोन-तीन बसेस एकाच वेळी धावतात, तर त्यानंतर दोन ते तीन तास एकही बस उपलब्ध नसते. परिणामी प्रवाशांना बसस्थानकांवर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते किंवा नाईलाजाने खासगी वाहनांचा वापर करून अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो.
हातगेघर व आखेगणी मार्गावरील बसफेऱ्या कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार रद्द केल्या जात असून, पर्यायी व्यवस्थेचा पूर्ण अभाव असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच वारंवार मागणी करूनही पाचगणी–पाचवड परिसरातून वाई व सातारा येथे जाणारी थेट बससेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत.
संदीप पवार यांनी मेढा आगार प्रशासनाकडे पाचवड–पाचगणी मार्गाचे वेळापत्रक तातडीने पुनर्नियोजित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रत्येक तासाला किमान एक बसफेरी सुरू करावी, रद्द होणाऱ्या बसफेऱ्यांची पूर्वसूचना देऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी तसेच पाचगणी–पाचवड येथून वाई व सातारा येथे थेट बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
“सार्वजनिक वाहतूक ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. प्रवाशांना वेळेवर, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. मेढा आगाराने तातडीने सुधारणा कराव्यात; अन्यथा प्रवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक लोकआंदोलन उभारले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा स्पष्ट इशारा संदीप पवार यांनी दिला आहे.



