Home » पांचगणी » राजपुरी येथील एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव; गोल्डन हार्ट फाउंडेशनतर्फे सायकलींचे वाटप

राजपुरी येथील एम. आर. भिलारे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव; गोल्डन हार्ट फाउंडेशनतर्फे सायकलींचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राजपुरी येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटी संचलीत कै. एम. आर. भिलारे हायस्कूलमधील मुलांना पुणे येथील ‘गोल्डन हार्ट फाउंडेशन’ यांचे वतीने विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी मधील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच गरजू विद्यार्थिनींना सायकली व सुरक्षेसाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

​शाळेच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. तेजस्विनी भिलारे या होत्या. यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे सचिव जतीन भिलारे यांच्यासह गोल्डन हार्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा शहनाज चावला, अनमोल चावला, शमीम वाघमळे, विनिता मॅडम आणि कार्ल सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

​ गोल्डन हार्ट फाउंडेशनने गेल्या वर्षी शाळेला दिलेल्या १० अत्याधुनिक संगणकांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळाली आहे. या मदतीच्या जोरावरच शाळेने दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा राखली असून, शाळेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्याने ९५ टक्के गुण मिळवून आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती मुख्याध्यापिका डॉ तेजस्विनी भिलारे यांनी दिली.

यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी वेळेवर शाळेत पोहोचावे व अभ्यासात सातत्य राहावे, म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले. आकर्षक सायकली आणि हेल्मेट मिळताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.

​याप्रसंगी बोलताना गोल्डन हार्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा शहनाज चावला यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा संदेश दिला. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य परिसरात वाढत्या प्लास्टिक वापराबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी विद्यार्थी व पालकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदची शपथ घेतली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना स्किपिंग रोप (दोरीवरच्या उड्या) देण्यात आल्या.

​या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लोहार यांनी केले. प्रास्ताविक जितेंद्र शिर्के यांनी केले , तर स्वरा इंगळे, वैष्णवी आंब्राळे, देविका पवार, आरोही ओवाळ आणि वेदांत आंब्राळे यांनी आभार मानले.

​कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित राजपुरे, राकेश नेवसे, सौ. विद्या ननावरे, महेश ननावरे, गणेश आखाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यास शशिकांत भिलारे, रुपेश कळंबे, अमर घाटे, जोशी देवघरे, गणेश जाधव यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers