पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : “शेती हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असून भावी पिढीने आधुनिक शिक्षणाची कास धरतानाच शेती आणि पर्यावरणाचे महत्त्वही तितक्याच गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून थांब चालणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी झाड लावून त्याचे पोटच्या लेकरासारखे संगोपन करण्याचा दृढ संकल्प करावा,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.
कृषी दिनाचे औचित्य साधून हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या ‘हिलरेंज हायस्कूल, भिलार’ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्षारोपण आणि विविध फळभाज्या व भाजीपाला रोपांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे, संचालिका तेजस्विनी नितीन भिलारे, हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, प्रमोद पवार, रणजित जाधवराव, सुनील भिलारे, अमोल भिलारे, माजी मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सुनील बगाडे आणि योगेश भिलारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या आजच्या आधुनिक विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष प्रक्रियेची ओळख व्हावी, त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी आणि निसर्गाविषयी सार्थ प्रेम जडावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अत्यंत कष्टाने तयार केलेली टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कोबी आणि फ्लॉवर यांसारख्या विविध फळभाज्यांची व भाजीपाल्यांची रोपे मांडली होती. विद्यार्थ्यांची ही सर्जनशीलता पाहून उपस्थित मान्यवर थक्क झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर विद्यार्थ्यांनीही सामूहिकरीत्या वृक्षसंवर्धनाची आणि पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली.
या उपक्रमाचे कौतुक करताना संस्थेच्या संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे म्हणाल्या की, “आजच्या पिढीमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली, निसर्गाविषयी आत्मीयता आणि आपल्या अन्नदात्या शेतकर्याबद्दल आदर निर्माण होणे काळाची गरज आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांवर झालेले हे निसर्गसंस्कार भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीसाठी मोलाचे दगड ठरतील.”
हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंगल ओंबळे, सुषमा गायकवाड, दीपाली पारठे आणि शैलेंद्र तिवारी यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने फळभाजीची रोपे कशी तयार करावीत, याचे उत्तम मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी भिकू पिसाळ, जितेंद्र शिर्के, वैशाली भिलारे, राजश्री भिलारे, संगीता खरात यांच्यासह परिसरातील अनेक पालक आणि उत्साही विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्याने फुलवलेले हे रोपांचे प्रदर्शन संपूर्ण भिलार परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.



