पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमी सुनील चंद्रकांत उंबरकर यांच्या वतीने आणी ‘वीर मराठा प्रतिष्ठान’च्या सहकार्याने उंबरी ता. महाबळेश्वर गावात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा तब्बल २५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थ आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी वड, पिंपळ, करंज, शिसू, शिरस, कवठ, बेहडा आणि बांबू अशा पर्यावरणपूरक व बहुगुणी देशी प्रजातींची रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. गावातील निसर्गप्रेमी सुनील चंद्रकांत उंबरकर यांनी ही सर्व रोपे उपलब्ध करून देत उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, केवळ झाडे लावून न थांबता ती मोठी होईपर्यंत नियमित पाणी देणे, संरक्षण करणे आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प उपस्थित युवकांनी केला. भविष्यात प्रत्येक राष्ट्रीय सण आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत उंबरकर, किरण विजय उंबरकर, प्रतिक राजेश उंबरकर, संतोष बाजीराव उंबरकर, अक्षय प्रकाश उंबरकर, रोहन उंबरकर, रोहित उंबरकर, ओंकार उंबरकर, ऋत्विक कासुर्डे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना निसर्गप्रेमी सुनिल उंबरकर यांनी सांगितले की, वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आणि पुढील पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.



