पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रसन्न पवार
कुडाळ : स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अशा गोंडस घोषणा देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या गप्पा मारणाऱ्या शिक्षण आणि प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा जावळी तालुक्यात उघडा पडला आहे. तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेली शौचालये आज दुरवस्थेच्या गर्तेत अडकली आहेत. कुठे दरवाजे तुटलेले, कुठे कड्या-कोयंडे नादुरुस्त, तर कुठे साचलेली प्रचंड घाण आणि दुर्गंधी… अशा अत्यंत अस्वच्छ वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. कागदोपत्री सुविधा पूर्ण दाखवून प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधेसाठीच मोठी कसरत करावी लागत असल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळांच्या आवारात उभ्या असलेल्या शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. फरशीवर साचलेला कचरा, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छतेमुळे वाढलेला डास-माशांचा उपद्रव यामुळे विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः शाळकरी मुलींसाठी ही समस्या अत्यंत गंभीर बनली असून सुरक्षितता आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तास सुरू असताना शौचालयाची गरज भासल्यास वापरायोग्य सुविधाच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागतो.
शासनाकडून दरवर्षी शाळांमधील बांधकाम, दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी भरघोस निधी दिला जातो. मग हा निधी नेमका जातो कुठे? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. केवळ इमारत उभी करून ‘सुविधा पूर्ण झाली’ असा आव आणणाऱ्या प्रशासनाने तिथला पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि नियमित साफसफाई याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. देखभालीअभावी लाखो रुपयांची कामे अल्पावधीतच धुळीस मिळाली असून कामाच्या गुणवत्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केवळ कागदी अहवाल न मागवता अधिकाऱ्यांनी स्वतः शाळांमध्ये जाऊन पाहणी करावी आणि नादुरुस्त स्वच्छतागृहांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट खेळ सुरू असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या विषयात थेट हस्तक्षेप करावा; निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता जावळी तालुक्यातील नागरिक व पालकांमधून केली जात आहे.



