पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : आर्थिक प्रगतीच्या जोडीला सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपत जावळी तालुक्यात आदर्श ठरलेल्या दापवडी येथील नामांकित ‘कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली)’ ने आपल्या यशस्वी वाटचालीचा ३६ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा केला. सहकार क्षेत्रातील विश्वासाचे नाव बनलेल्या या संस्थेने केवळ आर्थिक उलाढाल न करता, आपल्या सामाजिक कृतज्ञतेची परंपरा कायम ठेवली आहे. या अभिमानास्पद वाटचालीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा, देशसेवा आणि शासकीय सेवांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे व परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार करून समाजासमोर एक आदर्श पायंडा पाडला आहे.
हा गौरव सोहळा दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात अत्यंत भव्य आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला. सोहळ्याच्या प्रारंभी संस्थेचे प्रेरणास्थान वै. दत्तात्रय कळंबे महाराज, स्व. स. म. बेलोशे गुरुजी आणि स्व. तुकाराम घाडगे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील प्रगतीसोबतच ग्रामीण भागातील गुणवत्तेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचे काम या संस्थेने नेहमीच केले आहे, याचा प्रत्यय या सोहळ्यातून पुन्हा एकदा आला.
यावर्षी संस्थेच्या वतीने भारतीय वायूसेनेत (Indian Air Force) निवड झाल्याबद्दल सई प्रतापराव पाटील या रणरागिणीचा विशेष गौरव करण्यात आला. त्यासोबतच, महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस (Railway Police) पदी निवड झाल्याबद्दल अजय अशोक साळुंखे आणि महावितरणमध्ये (MSEDCL) विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल अक्षदा नथुराम रांजणे या विशेष कौतुकास पात्र ठरलेल्या तीन सुपुत्रांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन या तिन्ही गुणवंतांना गौरविण्यात आले. देशसेवा, सुरक्षा आणि शासकीय सेवेत थेट गवसणी घालणाऱ्या या तरुणांच्या यशामुळे दापवडी आणि संपूर्ण जावळी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या गुणवंतांचे कौतुक केले.
या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे, जावळी बँकेचे संचालक अजित कळंबे, काटवली सोसायटीचे चेअरमन शंकर पवार, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, काटवलीच्या सरपंच मीनाक्षी बेलोशे, रुईघरचे सरपंच अंकुश बेलोशे, रांजणीचे माजी सरपंच सुनील सपकाळ, घोटेघरचे माजी सरपंच दत्तात्रय रांजणे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बाबुराव रांजणे, प्रकाश रांजणे, विजय रांजणे, राम चिकणे, मकरंद उर्फ मधुकर पवार, इंदू शिंदे, भीमराव खरात, भरत रांजणे, शिवराम पवार, रामदास रांजणे, रामचंद्र बेलोसे, वसंत बेलोसे, अशोक बेलोशे, दीपक पार्टे, पांडुरंग शिंदे, महादेव बेलोशे, अरविंद कळंबे, गोपाळ बेलोशे, वैभव पाटील, सुरेश बेलोशे, जगन्नाथ बेलोशे, सुरेश गोळे, चंद्रकांत रांजणे, विलास पाटील, चंद्रकांत बेलोशे, व्यवस्थापक अनिल रांजणे यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, कर्मचारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा जावळी तालुक्यातील तरुणाईला नवी प्रेरणा देणारा ठरला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.



