पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, आदर्श शिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच माननीय श्री. रामदास गोळे (सर) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च प्रतिष्ठेचा “कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. या ऐतिहासिक बहुमानामुळे जावळी तालुक्यातील भालेघर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव क्रीडा जगताच्या नकाशावर सन्मानाने उजळले आहे.
गोळे सरांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे मातीतील अस्सल खेळ असलेल्या कबड्डीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी निष्ठेने समर्पित केली आहेत. मैदान गाजवण्यासोबतच अत्यंत कुशलतेने आणि शिस्तीने ‘राष्ट्रीय कबड्डी पंच’ म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. केवळ क्रीडा क्षेत्रच नव्हे, तर एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी पिढ्या घडवल्या. सोबतच लेखक, साहित्यिक आणि प्रकाशक म्हणून अक्षरांच्या दुनियेत मोलाची भर घालत समाजाला प्रगतीची दिशा दाखवली.
ग्रामीण भागातील लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी विलक्षण असून, सामाजिक व सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या शेकडो खेळाडूंसाठी हा क्षण नवचैतन्य देणारा ठरला आहे. हा पुरस्कार म्हणजे गोळे सरांच्या प्रदीर्घ तपस्या, त्याग आणि निष्ठेचा सर्वोच्च सन्मान आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोबत फोटो आहे



