पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार’ सातारा जिल्ह्यातील भालेघर तालूका जावळीचे सुपुत्र आणि ख्यातनाम राष्ट्रीय कबड्डी पंच रामदास गोळे (सर) यांना रत्नागिरीत मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला. या ऐतिहासिक बहुमानामुळे भालेघर गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव क्रीडा नकाशावर अधिक सन्मानाने उजळून निघाले आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने आणि रत्नागिरी जिल्हा व तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित २६ व्या ‘महाराष्ट्र राज्य कबड्डी दिन’ सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली. रत्नागिरी येथील माळनाका परिसरातील ‘देसाई बँक्वेट हॉल’मध्ये हा भव्य सोहळा पार पडला.
क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार भाई जगताप, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्यासह क्रीडा व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते रामदास गोळे सरांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि स्मृतीचिन्ह देऊन अत्यंत आदराने व गौरवाने सन्मानित करण्यात आले.
रामदास गोळे सरांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिलेला आहे. त्यांनी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि साहित्यिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे मातीतील अस्सल खेळ असलेल्या कबड्डीच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी पूर्ण निष्ठेने समर्पित केली आहेत. ‘राष्ट्रीय कबड्डी पंच’ म्हणून मैदानावर नि:पक्षपातीपणे आणि अत्यंत कुशलतेने कामगिरी बजावत त्यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
याशिवाय एक आदर्श शिक्षक म्हणून पिढ्या घडवतानाच लेखक, साहित्यिक आणि प्रकाशक म्हणून त्यांनी अक्षरांच्या दुनियेतही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील लोकांना आणि क्रीडाप्रेमींना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची विलक्षण हातोटी असून संपूर्ण सातारा जिल्हा त्यांच्याकडे एक मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून अत्यंत आदराने पाहतो.
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि गोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या शेकडो नवोदित खेळाडू व पंचांसाठी हा सोहळा अत्यंत ऊर्जा देणारा ठरला आहे. या यथोचित सन्मानाबद्दल गोळे सरांवर सध्या राज्यभरातून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



