Home » सातारा » सोन्याची पारख अन् प्रामाणिकपणाची लाख मोलाची जपवणूक! सातारा जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील सेवकाचा आदर्श; लॉकरवर विसरलेले सोन्या-चांदीचे दागिने केले सुरक्षित परत

सोन्याची पारख अन् प्रामाणिकपणाची लाख मोलाची जपवणूक! सातारा जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील सेवकाचा आदर्श; लॉकरवर विसरलेले सोन्या-चांदीचे दागिने केले सुरक्षित परत

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आणि ध्येयधोरणांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी करताना प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा भक्कम पायंडा पाडला होता. आजच्या राजकीय आणि प्रशासकीय वातावरणात या मूल्यांना तडा जात असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, याच काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) जिल्हा परिषद शाखेतील सेवक अनिल पवार यांनी आपल्या प्रामाणिक वर्तनातून या परंपरेची ज्योत तेवत ठेवली आहे. लॉकरवर चुकून विसरलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षितपणे संबंधित कर्मचाऱ्याला परत करून पवार यांनी जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेत मोलाची भर घातली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद कर्मचारी सौ. सुजाता तुपे या बँकेच्या लॉकरमधील व्यवहार पूर्ण करून निघून गेल्या होत्या. त्यानंतर सेवक अनिल पवार हे लॉकर कक्षाकडे गेले असता, त्यांना तेथे एक बेवारस पिशवी दिसून आली. कोणतीही भुलथाप किंवा मोहाला बळी न पडता पवार यांनी तातडीने ती पिशवी ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी ठेवली आणि ही बाब शाखाप्रमुख विवेक मोरे व कॅशियर सौ. रुपाली लावंड यांच्या निदर्शनास आणून दिली.

​कारभारात पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ही पिशवी उघडण्यात आली. पिशवीतील कापडी पिशवीवर लिहिलेल्या नावावरून ती पिशवी सौ. सुजाता तुपे यांची असल्याचे स्पष्ट झाले.

​या घटनेनंतर शाखाप्रमुख विवेक मोरे यांनी तत्काळ सौ. तुपे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बँकेत पाचारण केले. बँकेचे कर्मचारी अक्षय बोबडे, सौ. सुप्रिया देशमुख आणि कु. प्रज्ञा आगुंडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पिशवीची खात्री करण्यात आली. त्यामध्ये सोन्याचे विविध मौल्यवान दागिने तसेच पती व मुलांच्या चांदीच्या वस्तू जशाच्या तशा सुस्थितीत आढळल्या.

​आपले लाखो रुपयांचे दागिने सुखरूप आणि सुरक्षित हाती परत मिळाल्याचे पाहून सौ. सुजाता तुपे भावूक झाल्या. त्यांनी जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

​प्रामाणिकपणाची उज्वल परंपरा

सातारा जिल्हा बँकेत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २०२० मध्ये परळी शाखेत कार्यरत असताना शाखाप्रमुख विवेक मोरे यांनी एटीएम कार्डच्या आधारे एका आरोग्य सेवकाचा शोध घेऊन त्याचे रोख रकमेसह हरवलेले पाकीट परत केले होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जपलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे, राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांच्यासह जिल्हा बँक व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पत्रकार विशाल कदम, अजित जगताप आदींनी पवार व बँकेच्या टीमचे कौतुक केले आहे.

​सध्याच्या काळात जिथे स्वार्थ आणि धावपळ पाहायला मिळते, तिथे अनिल पवार यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा म्हणजे ‘बाजार फुलांचा भरला, मज तुळस कशी दिसेना?’ या म्हणीप्रमाणे प्रामाणिकपणाची तुळस फुलवणारा ठरला आहे, अशीच चर्चा सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुरू आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers