Home » पांचगणी » स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जावलीत मराठा महासंघाचा एल्गार; महावितरण कार्यालयावर धडक देत बजावला इशारा

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जावलीत मराठा महासंघाचा एल्गार; महावितरण कार्यालयावर धडक देत बजावला इशारा

पांचगणी न्यूज नेटवर्क

मेढा: महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या घरांवर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर सक्तीने बसवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’ विरोधात जावली तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सक्तीच्या विरोधात आज ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’च्या वतीने मेढा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयावर जोरदार धडक देण्यात आली. महासंघाच्या वतीने उपविभागीय अभियंत्यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर करून, ही आर्थिक लूट थांबवण्याची मागणी करत प्रशासनाचे तीव्र शब्दात लक्ष वेधण्यात आले.

​अखिल भारतीय मराठा महासंघाचे जावली तालुकाध्यक्ष सुनील धनावडे यांच्या हस्ते हे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना, जावली तालुक्यातही या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. सर्वसामान्य नागरिक, गरीब कुटुंब आणि शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना त्यांच्यावर हे महागडे व संशयास्पद मीटर लादण्याचा प्रयत्न महावितरण करत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी बोलताना सातारा जिल्हा संघटक बजरंग वांगडे यांनी आक्रमक भूमिका मांडली. “सर्वसामान्य आणि शेतकरी ग्राहकांवर स्मार्ट मीटर लादण्याची प्रक्रिया महावितरणने त्वरित थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या मीटरमुळे वीज बिलात अवाजवी वाढ होऊन सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष सुनील धनावडे यांनी जुनीच मीटर पद्धत अधिक विश्वासार्ह असून तीच सुरू ठेवावी, अशी मागणी केली. तर जिल्हा उपाध्यक्ष अनिल करंदकर आणि बजरंग चौधरी यांनी, “ग्राहकांना कोणत्याही विश्वासात न घेता, अंधारात ठेवून केली जाणारी ही सक्ती शासनाने तातडीने रद्द करावी,” असा कडक इशारा प्रशासनाला दिला.

महावितरणच्या मेढा उपविभागाला वेठीस धरणाऱ्या या आंदोलनात मराठा महासंघासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अनिल करंदकर (जिल्हा उपाध्यक्ष), बजरंग चौधरी (उपाध्यक्ष, सातारा जिल्हा), संदीप माने (सहा. सरचिटणीस, सातारा), शिल्पाताई गोळे (जिल्हा महिला अध्यक्षा), लक्ष्मीताई चिकणे (महिला अध्यक्षा, जावळी), चंद्रशेखर जाधव (अध्यक्ष, प्रिंट मीडिया), हणमंत शिंदे (कार्याध्यक्ष), संतोष महामुलकर (उपाध्यक्ष), प्रमोद जवळ तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रसिद्धीप्रमुख मोहन खुडे व छत्रपती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​महावितरणने या निवेदनाची आणि जनतेच्या भावनेची दखल घेऊन स्मार्ट मीटरची सक्ती मागे न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers