पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार : शालेय जीवनातील निखळ मैत्री, वर्गखोलीतील ते सोनेरी दिवस आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार… या सर्वच आठवणींना उजाळा देत हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील सन १९९९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला. तब्बल सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे सवंगडी एकत्र आल्याने विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाला उधाण आले होते. अनेक वर्षांनी एकमेकांना पाहिल्याने अनेकांचे डोळे पाणावले, तर जुन्या गप्पांनी वातावरणात पुन्हा एकदा बालपण अवतरले.
या ऐतिहासिक सोहळ्याला हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, सुनील गुरव, अरविंद पवार यांच्यासह विद्यमान मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, कल्पेश गायकवाड, शांताराम जाधव आणि नेहा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील मुले-मुली उच्चशिक्षित व्हावीत या उदात्त उद्देशाने आदरणीय बाळासाहेब भिलारे (दादा) यांनी या शाळेची स्थापना केली. आज याच शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बसून, मैत्रीचे धडे गिरवून आणि उत्तम संस्कार घेऊन तुम्ही सर्वजण विविध क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहात. तुमच्या या यशातच बाळासाहेब भिलारे दादांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले असून, संस्थेला तुमचा सार्थ अभिमान आहे.”
संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना एक महत्त्वाचे आवाहन केले. “आपण सर्वजण आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालात, हीच आपल्या शिक्षकांच्या कष्टांची खरी पावती आहे. आजच्या बदलत्या आणि आव्हानात्मक युगात नव्या पिढीला योग्य दिशा दाखवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी नाते कायम ठेवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी,” असे त्या म्हणाल्या.
या भावनिक सोहळ्यात माजी मुख्याध्यापक प्रकाश बेलोशे, अरविंद पवार, सुनील गुरव आणि विद्यमान मुख्याध्यापक मुकुंद शिंदे यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे कौतुक केले. तर माजी विद्यार्थी विनोद उंबरकर, दीपाली फुले आणि किरण धनावडे यांनी शालेय जीवनातील किस्से सांगत, आपल्या यशाचे श्रेय शाळेला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले.
आपल्या मातृभूमीबद्दल आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील डिजिटल शिक्षणाला हातभार लावण्यासाठी एक ‘स्मार्ट टीव्ही’ विद्यालयाला भेट दिला. या अनोख्या उपहाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे अत्यंत बहारदार सूत्रसंचालन विकास भिलारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चंद्रकांत गोळे यांनी मानले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालय प्रशासन आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी भविष्यातही हे स्नेहबंध अधिक दृढ ठेवण्याचा आणि शाळेच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प करत या सोहळ्याची सांगता केली.



