पांचगणी न्यूज नेटवर्क वाई: वाई-सातारा मार्गावरील वाकेश्वर-बावधन हद्दीत शुक्रवारी पहाटे एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला. या अपघातात वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागातील धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी या अपघातात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वाई पोलीस दलासह संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-सातारा रस्त्यावरून जात असताना, वाकेश्वर-बावधन परिसरात मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, श्रावण राठोड यांनी जागीच प्राण गमावले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. अनेक गुंतागुंतीच्या आणि मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात मोठी ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पोलीस विभागाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. फरार वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी वाई पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून पुढील तपास सुरू आहे.



