Home » वाई » वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला

पांचगणी न्यूज नेटवर्क

वाई : पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या वाई-पाचगणी घाटात मुसळधार पावसामुळे बुवासाहेब मंदिरानजीक आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. घाटातील डोंगराचा मोठा भाग, मोठमोठे दगड आणि माती थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घटनेनंतर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सध्या प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिकांच्या मदतीने रस्त्यावरील ढिगारा हटवण्यात आला असून, घाटातील वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे.

​आज सकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक बुवासाहेब मंदिराजवळ डोंगराचा कडा कोसळला. दरड कोसळल्याचे समजताच परिसरातील जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सरकारी मदतीची वाट न पाहता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील मोठे दगड आणि माती बाजूला सारण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सुरुवातीला संथ गतीने का होईना पण वाहतूक सुरू ठेवता आली.

​घटना घडून बराच वेळ झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी वेळेत पोहोचू शकले नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांत संवेदनशील घाटांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आवश्यक असताना, प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्यानंतर उशिराने पोहोचलेल्या संबंधित विभागाने आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत रस्त्यावरील संपूर्ण ढिगारा बाजूला केला असून, आता या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

​दरम्यान, वाई-पाचगणी घाटात अजूनही पावसाचा जोर कायम असून संपूर्ण परिसरात दाट धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. डोंगरावरून आणखी काही प्रमाणात दगड आणि माती खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी, विशेषतः पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि आपली वाहने काळजीपूर्वक चालवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers