Home » पांचगणी » पावसाळ्यात पर्यटकांना नो एन्ट्री! पाचगणी-महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे पुढील ५ दिवस पूर्णपणे बंद; आदेश मोडल्यास कडक कारवाई; सपोनी दिलीप पवार यांचा इशारा

पावसाळ्यात पर्यटकांना नो एन्ट्री! पाचगणी-महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे पुढील ५ दिवस पूर्णपणे बंद; आदेश मोडल्यास कडक कारवाई; सपोनी दिलीप पवार यांचा इशारा

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ आणि ‘रेड’ अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस व तालुका प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. संभाव्य अतिवृष्टी आणि आपत्तीचा धोका लक्षात घेऊन वाई उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीसाठी सर्व पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनी) दिलीप पवार यांनी दिला आहे. ​सपोनी दिलीप पवार यांनी नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, पाचगणी आणि महाबळेश्वर हा परिसर डोंगराळ व दुर्गम असल्याने अतिवृष्टीच्या काळात येथे दरडी कोसळणे, भूस्खलन आणि अचानक रस्ते खचणे अशा नैसर्गिक आपत्तींचा मोठा धोका असतो. पर्यटकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने या पाच दिवसांच्या कालावधीत पर्यटकांनी पाचगणी व महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळांवर जाणे पूर्णपणे टाळून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे. ​प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील जगप्रसिद्ध पर्यटन पॉईंट्सवर पर्यटकांना जाण्यास आता सक्त मनाई करण्यात आली आहे. यामध्ये पाचगणी परिसरातील टेबललँड व इतर सर्व पर्यटन स्थळे, महाबळेश्वरमधील आर्थर सीट, केट्स पॉइंट, एलिफंट्स हेड पॉईंट, विल्सन पॉइंट, सावित्री पॉइंट तसेच निसर्गरम्य लिंगमळा धबधबा, ऐतिहासिक प्रतापगड परिसर आणि तापोळा म्हणजेच मिनी महाबळेश्वर या सर्व प्रमुख आणि मुख्य पर्यटन ठिकाणांचा समावेश असून या भागात पर्यटकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ​पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी पाचगणी व महाबळेश्वर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. अपघातप्रवण क्षेत्रे आणि सेल्फी पॉईंट्सच्या ठिकाणी तातडीने “धोकादायक क्षेत्र” आणि “प्रवेश निषिद्ध” चे फलक लावण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या काळात घाटरस्त्यांवर किंवा कड्यांच्या कडेला वाहने थांबविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास तो मार्ग तातडीने बॅरिकेड्स लावून बंद केला जाईल आणि तिथे पोलीस बंदोबस्त तैनात असेल, अशी माहिती सपोनी पवार यांनी दिली. ​हा आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ मधील तरतुदींनुसार लागू करण्यात आला आहे. आदेशाचा अवमान करून बंदी असलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक व कडक फौजदारी कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers