पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन व शेतीचे नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील धनगरवाडी (बोंडारवाडी) येथील सर्व्हे क्रमांक २/२७ मधील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
या शेतजमिनीचे मालक दगडू ठकू आखाडे, धोंडू ठकू आखाडे आणि सूर्यकांत गौरू आखाडे यांच्या शेतात प्रचंड भूस्खलन झाले आहे. शेतातील संपूर्ण बोअरवेल जमीन सरकून खोल दरीत कोसळली असून, यामुळे भविष्यातील सिंचन व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे, सुमारे ५०० फूट दगडी बांध कोसळला असून बांधालगतची सुमारे २० फूट रुंदीची जमीनही पूर्णपणे खचली आहे.
या दुर्घटनेमुळे स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तयार करण्यात आलेले प्लॉट पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेती करणे जवळपास अशक्य झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभारलेली शेती काही तासांत उद्ध्वस्त झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला असून, शासनाकडे अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने आर्थिक मदत, शेती पुनर्वसनासाठी निधी तसेच सिंचन सुविधा पुन्हा उभारण्यासाठी सहाय्य द्यावे, अशी मागणी केली आहे. महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अशा सर्व नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळणे ही काळाची गरज असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



