पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची अभूतपूर्व सांगड घालत पांचगणीच्या मुख्य रस्त्यांवर भक्तीचा आणि स्वच्छतेचा आगळावेगळा रंग पाहायला मिळाला. पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, नगरपालिकेची शाळा क्रमांक १ व २ तसेच नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्मल दिंडी’ या अभिनव जनजागृती उपक्रमाचे अतिशय दिमाखात आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्सवाला स्वच्छतेच्या चळवळीची जोड देत चिमुकल्या वारकऱ्यांनी “स्वच्छ पांचगणी – सुंदर पांचगणी” हा संदेश पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या मनावर कोरला.
सकाळी सांस्कृतिक भवन येथून या निर्मल दिंडीचा प्रारंभ झाला. वारकरी वेशभूषेत नटलेली मुले, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, टाळ-मृदंगाचा गजर आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या घोषणांनी संपूर्ण पाचगणी परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. सांस्कृतिक भवन – शिवाजी चौक – विठ्ठल मंदिर आणि पुन्हा सांस्कृतिक भवन अशा आखलेल्या मार्गावरून निघालेल्या या दिंडीत ३५० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक तसेच हिलदारी टीमचे प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
”स्वच्छता हीच खरी सेवा”, “कचरा योग्य ठिकाणीच टाका” आणि “पर्यावरण जपून पर्यटन समृद्ध करा” अशा आशयाचे फलक हातात धरून विद्यार्थ्यांनी नागरिकांना जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून दिली. आषाढीचा हा सोहळा केवळ पारंपरिक पूजेपुरता मर्यादित न ठेवता, पर्यटननगरी पांचगणी स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापनात आपला सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, हे विद्यार्थ्यांच्या आवाहनातून प्रकर्षाने जाणवत होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपालिका शाळा क्र. १ व २ चे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण हिरवे व श्रीमती वंदना शिंदे, तसेच श्री. रोहन पवार, श्री. कापसे सर यांच्यासह दोन्ही शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर हिलदारी टीमच्या सदस्यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले.
विठ्ठलभक्तीसोबतच परिसर स्वच्छ ठेवणे हीसुद्धा ईश्वरसेवाच आहे, हा मूलमंत्र देणाऱ्या या निर्मल दिंडीने सर्व पांचगणीकरांचे लक्ष वेधून घेतले. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाची जपणूक आणि संस्कारांची रुजवणूक करणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून आणि पर्यटकांकडून कौतुक होत आहे.



