Home » पांचगणी » दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे यांना ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे यांना समर्थ सातारा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित ‘गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. मुंबईतील दहिसर येथील लता मंगेशकर हॉलमध्ये रविवारी (ता. २ ऑगस्ट) सकाळी १० वाजता आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे.

​‘सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नव्हे, तर विश्वास, पारदर्शकता आणि लोकसेवेचा ध्यास’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवत भिलारे यांनी बँकेला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेले आहे. २०१५ मध्ये त्यांनी चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी बँकेचा संमिश्र व्यवसाय सुमारे ९५० कोटी रुपयांचा होता. त्यांनी आखलेली आर्थिक शिस्त, पारदर्शक कर्जवितरण, प्रभावी वसुली, आधुनिक बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख धोरणांमुळे आज बँकेचा व्यवसाय तब्बल १७५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्यवसायात साधलेली ८०० कोटी रुपयांची ही ऐतिहासिक वाढ सहकार क्षेत्रातील मैलाचा दगड ठरली आहे.

​ग्रामीण भागातील शेतकरी, माथाडी कामगार, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचवून त्यांनी जावळी बँकेला राज्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह संस्था बनवले. त्यांच्या याच दूरदृष्टीची दखल घेऊन समर्थ सातारा प्रतिष्ठानचे सुभाष वांगडे यांनी त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. सहकार क्षेत्रातील या उत्तुंग यशाबद्दल आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विक्रम भिलारे यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत असून सर्व स्तरातून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers