पांचगणी न्यूज नेटवर्क
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची सातत्याने होणारी आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे आणि परिसरात पाऊस सुरू असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या सर्व गावांना व लोकवस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे लहान-मोठे ओढे, नाले आणि धबधब्यांतून धरणात प्रतिसेकंद सरासरी १८,३९५ क्युसेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या २४ तासांतच धरणात १.८६ टीएमसी नवीन पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा ८२.९८ टीएमसीवर पोहोचला असून, यातील उपयुक्त पाणीसाठा ७७.८६ टीएमसी झाला आहे. कुल १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेले कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता अवघ्या २२.२७ टीएमसी पाण्याची गरज आहे.
चालू मान्सून हंगामात १ जूनपासून आतापर्यंत कोयना परिसरात २७६२ मि.मी., नवजा येथे ३३२५ मि.मी. आणि महाबळेश्वर परिसरात सर्वाधिक ३४८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आगामी काळात धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ पाहून त्यानुसार कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याचे वेळेनुसार नियोजन केले जाईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर यांनी दिली आहे. पाणी विसर्गामुळे नदीची पातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



