Home » महाबळेश्वर » महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील १०५ गावांचा वनवास संपला; लालपरी पुन्हा धावली, नवीन वेळापत्रक जाहीर! : नगराध्यक्ष सुनील. शिंदे आणि नगरसेवक ॲड. संजय जंगम यांचे प्रयत्न यशस्वी

महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील १०५ गावांचा वनवास संपला; लालपरी पुन्हा धावली, नवीन वेळापत्रक जाहीर! : नगराध्यक्ष सुनील. शिंदे आणि नगरसेवक ॲड. संजय जंगम यांचे प्रयत्न यशस्वी

पांचगणी न्यूज नेटवर्क

​महाबळेश्वर: महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्ता खचल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागातील १०५ गावांचा महाबळेश्वर तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. रस्ता बंद असल्याने शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि समाजसेवकांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. परिणामी, या भागातील एसटी बस सेवा अखेर पूर्ववत झाली असून आज, ४ ऑगस्ट २०२६ पासून नवीन वेळापत्रकानुसार बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

​या समस्येचे गांभीर्य ओळखून १०५ गाव समाजाचे अध्यक्ष घनश्याम आपा सकपाळ, ४५ गाव समाजाचे अध्यक्ष आनंद दादा मुरडे, ३२ गाव समाजाचे अध्यक्ष धोंडिबा शेठ धनावडे, ज्येष्ठ समाजसेवक बाबुदादा सकपाळ, भाऊसाहेब मोरे, संपत भाऊ जाधव आणि कृष्णा कदम यांनी एकत्र येत महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील व संजय जंगम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. त्यानंतर नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्वर आगर प्रमुख जाधव साहेब यांच्यासोबत एक तातडीची व सकारात्मक बैठक पार पडली. या संयुक्त बैठकीत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत या दुर्गम भागातील एसटी बस सेवा पुन्हा सुरळीत केली.

​प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसातून एकूण तीन फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार पहिली फेरी तापोळा येथून सकाळी साडेसात वाजता सुटेल आणि साडेआठ वाजता महाबळेश्वरला पोहचेल, तर महाबळेश्वर येथून सकाळी साडेनऊ वाजता सुटून साडेदहा वाजता तापोळा येथे पोहचेल. दुसरी फेरी तापोळा येथून सकाळी साडेअकरा वाजता सुटेल आणि दुपारी साडेबारा वाजता महाबळेश्वरला पोहचेल, तर महाबळेश्वर येथून दुपारी दोन वाजता सुटून दुपारी तीन वाजता तापोळा येथे पोहचेल. तसेच तिसरी फेरी तापोळा येथून संध्याकाळी पाच वाजता सुटेल आणि संध्याकाळी सहा वाजता महाबळेश्वरला पोहचेल, तर महाबळेश्वर येथून संध्याकाळी साडेसहा वाजता सुटून रात्री साडेसात वाजता तापोळा येथे पोहचेल.

विशेष म्हणजे, रात्रीच्या शेवटच्या फेरीनंतर बसचा रात्रीचा मुक्काम तापोळा येथेच राहील, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पहिली फेरी वेळेवर सुटू शकेल. सर्व प्रमुख पदाधिकारी, समाजसेवक आणि नगरपरिषद प्रशासनाच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे दुर्गम भागातील हजारो ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना खूप मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers