Home » महाबळेश्वर » आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद; अतिवृष्टी व दरडींच्या धोक्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क

​अलिबाग / पोलादपूर : मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याची टांगती तलवार आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील (SH-139) आंबेनळी घाटातील वाहतूक १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रायगडचे जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी मोटार वाहन कायद्यातील कलमांन्वये सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

​पोलादपूरचे तहसीलदार आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने सादर केलेल्या अहवालानुसार, आंबेनळी घाटात प्रशासनाकडून दरड हटवणे, ड्रेनेजची देखभाल, रिटेनिंग स्ट्रक्चरची दुरुस्ती आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाय सातत्याने केले जात आहेत. मात्र, घाटातील नाजूक भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता कोणत्याही क्षणी गंभीर अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

​यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, हवामानाचा अंदाज आणि रस्त्याची सद्यस्थिती पाहता ही बंदी आणखी वाढवण्याची विनंती तहसीलदारांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलत १६ ऑगस्टपर्यंत घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.

​या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महामार्ग सुरक्षा पथक आणि प्रादेशिक परिवहन विभागाला सतर्क करण्यात आले आहे. महाबळेश्वर व कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिक, चालक आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या या निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers